अपक्ष आमदार देवेंद्र भुयार बैठकीसाठी मुंबईला निघणार आहेत. सध्या अनेक आमदार गुवाहाटीकडे प्रयाण करत असल्यानं भुयार यांना तुम्ही खरंच मुंबईला जाताय की गुवाहाटीला असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना भुयार यांनी त्यांचं विमान तिकीट दाखवलं. आडवातिडवा मार्ग मी घेत नाही. माझ्याकडे मातोश्रीचा मार्ग नाही. रेशीमबागेत मी जात नाही. मी केवळ सिल्वर ओकवर जातो, असं भुयार म्हणाले.
देवेंद्र भुयार उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू मानले जातात. अजितदादा माझ्या मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवतात. त्यांनी एका बैठकीसाठी मुंबईला बोलावलं आहे. त्यामुळे विमानानं मुंबईला जाणार आहे. ११ वाजून १० मिनिटांचं फ्लाईट आहे, असं म्हणत भुयार यांनी थेट विमान तिकीटच दाखवलं.
एकनाथ शिंदे लवकरच स्वगृही परततील, मातोश्रीवर जातील, असा विश्वास भुयार यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले आहेत. पण विठ्ठलाभोवती जसे काही वाईट बडवे होते, तशी स्थिती आहे. विठ्ठल चांगला आहे. मातोश्री पवित्र आहे. पण विठ्ठलाच्या आसपास असलेले बडवे वाईट आहेत, अशा शब्दांत भुयारांनी ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर भाष्य केलं.
तुमचा निशाणा नेमका कोणावर आहे? संजय राऊतांवर की मिलिंद नार्वेकरांवर? असे प्रश्न विचारल्यावर संजय राऊत चांगले आहेत. महाविकास आघाडी सरकार आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सरकार व्यवस्थित चालावं हाच त्यांचा प्रयत्न राहिला आहे. मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं होतं. दोनदा मी ठाकरेंना भेटलो आणि ती भेट राऊतांमुळेच होऊ शकली, असं भुयारांनी सांगितलं.
शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार नाराज होण्यामागचं कारण मातोश्रीवरील काही बडवे आहेत. भेटीसाठी वेळ देत नाहीत. मुख्यमंत्र्यांशी संपर्क होऊ देत नाहीत. त्यामुळे ही वेळ आली आहे. बडव्यांमुळे विठ्ठलाची बदनामी होत आहे, असं भुयार म्हणाले.