यावेळी देवेंद्र भुयार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाविषयी भाष्य केले. या सगळ्यासाठी भुयार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या काही लोकांना जबाबदार धरले आहे. एकनाथ शिंदे यांनी आज जो काही निर्णय घेतलाय, तो बदलून ते मातोश्रीवर जातील यामध्ये शंका नाही. उद्धव ठाकरे यांच्याभोवती असणाऱ्या दोन-चार लोकांमुळे आज ४३-४४ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क होत नाही, भेटीसाठी त्यांची वेळ मिळत नाही, हेच या आमदारांच्या नाराजीचे मुख्य कारण आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर आमदारांची कोणतीही नाराजी नाही. त्यांनी कोणाचं नुकसान केलेले नाही, असे भुयार यांनी म्हटले.
यावेळी देवेंद्र भुयार यांना उद्धव ठाकरे यांच्याभवती असणारे बडवे म्हणजे संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुयार यांनी म्हटले की, संजय राऊत यांचा महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात फार मोठा वाटा आहे. तसेच ठाकरे सरकार चालावे, हीच त्यांची भूमिका आहे. मला स्वत:ला दोनवेळा संजय राऊत हेच मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले आहेत, असे सांगत भुयार यांनी एकप्रकारे संजय राऊत यांची पाठराखण केली. त्यामुळे भुयार यांच्या टीकेचा रोख मिलिंद नार्वेकर यांच्या दिशेने असल्याचे बोलले जाते.
‘तुम्ही मुंबईला चाललायत की गुवाहाटीला, देवेंद्र भुयारांनी विमानाचं तिकीटच दाखवलं’
सध्या अनेक आमदार गुवाहाटीकडे प्रयाण करत असल्यानं भुयार यांना तुम्ही खरंच मुंबईला जाताय की गुवाहाटीला असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना भुयार यांनी त्यांचं विमान तिकीट दाखवलं. आडवातिडवा मार्ग मी घेत नाही. माझ्याकडे मातोश्रीचा मार्ग नाही. रेशीमबागेत मी जात नाही. मी केवळ सिल्वर ओकवर जातो, असं भुयार म्हणाले.