प्रियांका गांधी यांचे दुसरे विमान येण्यासाठी तीन-चार तासांचा अवधी होता. या काळात प्रियांका गांधी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना विमानतळावर बोलावून घेतले होते. काँग्रेसचे नेते कमलनाथ हेदेखील बुधवारी मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर आज प्रियांका गांधीच मुंबईत आल्याने चर्चेला उधाण आले होते. मात्र, प्रियांका गांधी या मुंबई विमानतळावरूच परस्पर दुसऱ्या ठिकाणी जाणार असल्याचे स्पष्ट झाले. प्रियांका गांधी यांनी सकाळी सात वाजताच काँग्रेस नेत्यांना विमानतळावर बोलावून घेतले होते. त्यानंतर प्रियांका आणि काँग्रेस नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीतबाबत चर्चा झाल्याचे समजते.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आता सरकार वाचवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. आज दुपारी १२ वाजता शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. तर शरद पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. तर काँग्रेसकडूनही आपले सर्व ४४ आमदार सुरक्षित राहतील, याची खबरदारी घेतली जात आहे.
आणखी सहा आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात?
शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे. माझ्यासोबत ४६ आमदार आहेत आणि आणखी १० आमदार येतील, असा दावा शिंदेंनी काल गुवाहाटीच्या विमानतळाबाहेर केला. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील हे नेते शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का बसला. आता सेनेचे आणखी सहा आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. त्यातील काही जण गुवाहाटीला गेल्याची माहिती समोर येत आहे.