सातारा : राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड पुकारल्यामुळे आता महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याच्या स्थितीत आलं आहे. अशात ज्या आमदारांमुळे हे सरकार धोक्यात आलं ते शिवसेनेचे सगळे आमदार सध्या गुवाहाटी इथे तळ ठोकून आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार सध्या बंडाच्या पवित्र्यात आहेत.
या बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या कारभारावर नाराजीच्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि पाटणचे आमदार गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई हे सुद्धा सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, याच आमदारांकडून एक मोठी प्रतिक्रिया मटा प्रतिनिधीसोबत खाजगीत बोलताना आली आहे. ‘लोकांचा लोकनाथ एकनाथ’; शिवसैनिकांकडून एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा सगळं आमच्या मनासारखं घडत आहे. एकनाथ शिंदे यांनी जसं ठरवलं तसंच सगळं घडत असल्याची प्रतिक्रिया एका आमदारांनी खाजगीत दिली. यामुळे एकनाथ शिंदे यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाली का? अशी राजकीय चर्चा सध्या सुरू आहे. साताऱ्यातून सध्या गृहराज्यमंत्रीपद हे शंभुराज देसाई यांच्याकडे आहे. आता केलेल्या बंडात शंभुराज देसाई हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत चांगलेच सक्रीय आहेत. यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळ्यानंतर जे सरकार तयार होईल, यात शंभुराज देसाई यांना आता कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा सुद्धा रंगू लागल्या आहेत.