महसूल, गृह, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, वित्त, ग्रामविकास, गृहनिर्माण, परिवहन अशा सर्वच विभागांत बदल्यांसंबंधीच्या हालचाली मे मध्येच सुरू झाल्या होत्या. मात्र, बदल्यांसबंघी सरकार आणि प्रशासनातही एकमत होत नसल्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेवटी बदल्याच पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यासाठी निवडणुका आणि अन्य प्रशासकीय कारणेही मिळाली होती. त्यामुळे ३१ मे ही बदल्यांची मुदत संपण्याआधीच बदल्या ३० जूनपर्यंत स्थगित करण्याचा आदेश देण्यात आला.
मधल्या काळात दोन्ही निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता ३० जून तारीख जवळ आल्याने पुन्हा यासंबंधीची हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, त्याच दरम्यान राज्यात विचित्र स्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत बदल्यांसंबंधी काय भूमिका घेतली जाते? याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे डोळे लागले आहेत. ज्यांना सोयीच्या बदल्या हव्या आहेत, त्यांना अशा राजकीय अस्थिर परिस्थितीत ते शक्य होणार का? याचीही चिंता लागून राहिली आहे. सध्याचे वातावरण कधी निवळणार? ते निवळले नाहीच तर सध्याचे सरकार ३० जूननंतर किंवा त्याआधीही बदल्यांना परवानही देणार का? याचीही उत्सुकता आहे.