एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना घेऊन सुरुवातीला सूरतच्या ली मेरेडियन हॉटेलमध्ये तळ ठोकून होते. मात्र, मुंबई ते सूरत हे अंतर फार नसल्याने शिवसेनेच्यादृष्टीने बंडखोर आमदार हे काहीसे अॅक्सिसेबल होते. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरांना सूरतमधून हवाईमार्गे गुवाहाटीत आणण्यात आल होते. गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये या सगळ्यांना ठेवण्यात आले आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांची सरबराई केली जात आहे. याठिकाणी शिवसेना पोहोचण्याचा धोका कमी आहे. त्यामुळे शिवसेनेतील बंडखोर आमदार काहीसे निश्चिंत होते. मात्र, आज सकाळी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलवर अचानक हल्लाबोल करत सर्वांनाच अचानक धक्का दिला.
यावेळी तृणमूल काँग्रेसच्या आंदोलकांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, भाजपने महाराष्ट्रातील राजकारण आसाममध्ये खेळू नये. भाजपने शिवसेनेच्या आमदारांची खरेदी-विक्री करण्यासाठी त्यांना याठिकाणी आणून ठेवले आहे. आसामच्या अनेक भागांमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, केंद्रातील भाजप सरकारने पूर पीडितांना एकाही पैशाचीही मदत केलेली नाही. त्याऐवजी भाजपने महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांना आसाममध्ये आणून घोडेबाजार सुरु केला आहे, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली.
शिवसेनेची गळती सुरुच, आणखी सहा आमदार गुवाहाटीत?
शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे. माझ्यासोबत ४६ आमदार आहेत आणि आणखी १० आमदार येतील, असा दावा शिंदेंनी काल गुवाहाटीच्या विमानतळाबाहेर केला. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील हे नेते शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का बसला. आता सेनेचे आणखी सहा आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. त्यातील काही जण गुवाहाटीला गेल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेनेचे एकूण सहा आमदार नॉट रिचेबल आहेत. पैकी तीन जण गुवाहाटीला पोहोचले आहेत. पोलीस सुरक्षेत हे आमदार हॉटेल रॅडिसन ब्ल्यूवर पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी शिंदे स्वत: हॉटेलच्या लॉबीत उभे होते. या आमदारांच्या कार्सच्या काचा काळ्या रंगाच्या होत्या. त्यामुळे त्यांचे चेहरे दिसू शकले नाहीत. मात्र या तीन आमदारांपैकी दोन जण मुंबईचे असल्याची माहिती मिळत आहे. माहिमचे आमदार सदा सरवणकर आणि कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर अशी त्यांची नावं आहेत.