मुंबई: शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे. माझ्यासोबत ४६ आमदार आहेत आणि आणखी १० आमदार येतील, असा दावा शिंदेंनी काल गुवाहाटीच्या विमानतळाबाहेर केला. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील हे नेते शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का बसला. आता सेनेचे आणखी सहा आमदार गुवाहाटीला पोहोचले आहेत.

एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. शिवसेना आणि सरकार वाचवण्याचं आव्हान ठाकरेंसमोर आहे. या परिस्थितीत काय काय होऊ शकतं, यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सविस्तर भाष्य केलं. पक्षातील दोन तृतीयांश आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. तो दावा शिवसेनेकडून खोडण्यात आलेला नाही, असं आंबेडकर म्हणाले.
आपला गट हीच शिवसेना! एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्षांकडे दावा करणार?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोविड पॉझिटिव्ह आहेत. अशा स्थितीत शिंदे यांच्याकडे दोन पर्याय आहेत. ते राज्यपालांना किंवा विधानसभा अध्यक्षांना पत्र देऊ शकतात. विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. अशा परिस्थितीत उपाध्यक्षांना अधिकार असतात. शिंदेंनी राज्यपालांना पत्र दिल्यास ते मुख्यमंत्री ठाकरेंना बहुमत सिद्ध करायला सांगतील. उपाध्यक्षांना पत्र पाठवण्यात आल्यास ते शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्या आमदारांना बोलावतील. पत्रावर तुमच्याच स्वाक्षऱ्या आहेत याची विचारणा करतील, अशी कायदेशीर प्रक्रिया आंबेडकरांनी सांगितली.

शिंदेंच्या बंडाबद्दल भाजप सेफ गेम खेळत आहे. त्यांच्याकडे गमावण्यासारखं नाही. शिवसेना भाजप दूर गेल्यापासून गेल्या दोन वर्षांपासून भाजप एक प्रचार करत आहे. आम्हीच हिंदूंचे प्रतिनिधी आहोत, अशा स्वरुपाचा प्रचार भाजपकडून केला जात आहे. त्याला संघाचा पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत खरी कसोटी एकनाथ शिंदेंची लागेल, असा दावा आंबेडकरांनी केला.
शिवसेनेला पाठिंबा दिलेले शंकरराव गडाख सध्या कुठे आहेत?; समोर आलं कारण
आपला गट शिंदे कसा एकत्र ठेवतील ते पाहणं महत्त्वाचं असेल. कारण परिस्थितीचा फायदा घेऊन भाजप त्यांच्यासमोर गट विलीन करण्याची अट ठेऊ शकतो. कारण आपणच हिंदूंचे प्रतिनिधी असल्याचा प्रचार त्यांच्याकडून सुरू आहे. त्यातच शिंदे आणि ठाकरेंमधील संघर्ष पाहता शिंदे माघारी जाऊ शकत नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत तर ते जाणारच नाहीत. त्यामुळे या परिस्थितीचा फायदा घेत भाजपकडून त्यांच्यासमोर विलीनकरणाची अट ठेवली जाऊ शकते. ही परिस्थिती शिंदे किती कौशल्यानं हाताळतात हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असेल, असं विश्लेषण आंबेडकरांनी केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here