Eknath Shinde : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीने शिवसेनेमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेत उभी फूट पडते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेच्या धनु्ष्यबाणावर दावा करण्यास सुरुवात केल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये राजकीय संघर्ष अटळपणे दिसू लागला आहे.   

दरम्यान, एका वृत्तपत्रातील बातमी सोशल मीडियामध्ये चांगलीच व्हायरल होत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि ईडीच्या धास्तीने बंडाचा पवित्रा घेतला आहे का? अशी चर्चा होऊ लागली आहे. त्या बातमीमध्ये म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे सचिव सचिन जोशी यांना दहा दिवसांपूर्वी ईडीची नोटीस आली होती. ही नोटीस आल्यापासून ते ठाण्यातून गायब आहेत. सचिन जोशी कुठे आहेत? आणि त्यांना बजावलेल्या ईडीच्या नोटिशीचा एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी काय संबंध आहे, अशी चर्चा रंगली आहे” असे या बातमीमध्ये म्हटले आहे. मात्र ही बातमी कोणत्या वृत्तपत्रातील आहे याची माहिती समजून येत नाही. 


 
सध्या शिवसेनेचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. या नेत्यांना ईडीची चांगलीच धास्ती वाटू लागली आहे. त्यामुळे ईडीने त्रस्त असलेले सर्व नेते एकत्रित होऊन आता एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत.  

नाराजांचा मुद्दा विचारधारेचा पण खरी अडचण ईडीची पीडा

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपने ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांचा केलेला यथेच्छ वापर केल्याचे काही लपून राहिलेला नाही. राज्यातील शिवसेनेचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. यामध्ये शिवसेना मुलुख मैदानी तोफ असलेल्या संजय राऊत यांनाही दणका बसला आहे. मिलिंद नार्वेकर यांनाही बंगला पाडावा लागला. इतकचं नव्हे, तर मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत ईडी पोहोचली. श्रीधर पाटणकर ( रश्मी ठाकरे यांचे बंधू) यांचीही संपत्ती जप्त झाली आहे. भाजप नेते महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेवर दररोज गल्लीपासून दिल्लीपर्यंत आरोप करत आहेत. त्यामुळे अनेक शिवसेना नेत्यांनी ईडीची धास्ती घेतली आहे. बंडाळीचे नेतृत्व करत असलेल्या एकनाथ शिंदे यांनीही ईडीची धास्ती घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. 

अनिल परब, प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, आनंदराव अडसुळ, रवींद्र वायकर, या सर्व नेत्यांना ईडीचा दणका बसला आहे. मात्र, अनिल परब यांचा अपवाद वगळता या सर्व नेत्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी भाजपची वाट धरल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here