उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतरही शिवसेना आमदार पक्ष का सोडून आहेत, असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटील यांनी म्हटले की, शिवसेनेचे मुंबईतील आमदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार नाहीत, असे आम्हाला वाटत होते. पण मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकरही आज सकाळी गुवाहाटीला गेले तेव्हा मला आश्चर्य वाटलं. पण ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याचं दिसत आहे. कदाचित हे आमदार गुवाहाटीला इतरांना परत आणण्यासाठी किंवा तिकडे काय चाललंल, हे पाहण्यासाठी गेले असतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे आता गुवाहाटीत नव्याने शिंदे कॅम्पमध्ये दाखल झालेले आमदार काही गहजब उडवून देणार का, हे पाहावे लागेल.
मात्र, त्याचवेळी जयंत पाटील यांनी महाराष्ट्राबाहेर गेलेले शिवसेना आमदार पुन्हा येतील आणि पक्षात कार्यरत होतील, असा विश्वासही व्यक्त केला. शिवसेना एकसंध राहावी, ही आमची इच्छा आहे. मला खात्री आहे की, हे सर्व बंडखोर आमदार उद्धव ठाकरे यांच्यापुढे उभे राहतील तेव्हा ते उद्धव यांचं नेतृत्त्व झुगारून देऊ शकत नाहीत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
‘आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल’
द्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार टिकावे, हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. या संकटात आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. आम्ही त्यांना शक्य ती सर्व मदत करू. राष्ट्रवादी काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी जयंत पाटील यांनी म्हटले की, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी या संकटात आम्ही तुमच्यासोबत असल्याचे उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत हे सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करेल, असे जयंत पाटील यांनी स्षष्ट केले.