राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय खलबतं सुरू आहेत. सध्याच्या चाललेल्या राजकीय वातावरणात संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. ‘महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे’. असा विश्वास दाखवत जयंत पाटील यांनी ट्वीट केलं आहे.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. तब्बल दोन तास सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं सुरु होती. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार टिकावे, हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. या संकटात आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. आम्ही त्यांना शक्य ती सर्व मदत करू. राष्ट्रवादी काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.