मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह १२ बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली. शिवसेनेने उचललेल्या या आक्रमक पावलानंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. १२ आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आणि शिवसैनिक आहोत. आम्ही कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे, असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह १२ जणांची आमदारकी रद्द करा, नरहरी झिरवळ यांच्याकडे सेनेची मागणी

शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे १२ बंडखोर आमदारांचं सदस्यत्त्व रद्द करण्यासाठी याचिका सादर केली आहे. शिवसेनेच्या महत्त्वाच्या बैठकांना गैरहजर राहिल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नवनियुक्त गटनेते अजय चौधरी यांनी झिरवळ यांच्याकडे केली आहे. या १२ आमदारांमध्ये एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, महेश शिंदे यांचा समावेश आहे. त्यानंतर शिवसेनेच्या या खेळीला एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंशी पंगा?

“कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत”

“आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे”, असं एकामागून एक ४ ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील संघर्ष आणखी तीव्र केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here