एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आठ ते नऊ जिल्ह्यांतील शिवसेनेचे आमदार गळाला लावले होते. मात्र, कालपर्यंत मुंबई आणि तळकोकणातील आमदार शिवसेनेच्या गोटात होते. परंतु, काल मुंबईतील मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर गुवाहाटीत जाऊन एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर आज भास्कर जाधवही नॉट रिचेबल झाल्याने आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसल्याची चर्चा होती. तर दुसरीकडे यामुळे एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढत आहे. एकनाथ शिंदे गटात आतापर्यंत जवळपास ४५ ते ५० आमदार दाखल झाल्याची माहिती आहे.
‘माझ्यासोबत ५० आमदार, आजच्या बैठकीत निर्णय घेऊ’
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे देखील गुवाहाटीला पोहोचले असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, अद्याप भास्कर जाधव यांच्याशी संपर्क झाला नसल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच, सध्या आम्हाला ५० आमदारांचा पाठिंबा असून त्यात ४०पेक्षा अधिक आमदार शिवसेनेचे आहेत. तर, इतर अपक्ष आमदार आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज आमची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल. राज्यपालांना पत्र द्यायचं की नाही याचा निर्णयही या बैठकीत घेतला जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.