चंद्रपूर : शिवसेनेतून बंड करत ४० पेक्षा अधिक आमदार फोडणाऱ्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. महाविकास आघाडीला समर्थन देणारे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनीही अखेर गुवाहाटीचा रस्ता धरला आहे. आमदार जोरगेवार यांच्याशी शिंदे गटाने संपर्क साधला होता. मात्र मतदारसंघातील समर्थकांशी चर्चा केल्यावर निर्णय घेऊ, अशी भूमिका जोरगेवारांनी घेतली होती. त्यानंतर ४८ तासांतच जोरगेवार शिंदे गटात सामील झाले आहेत.

राज्यसभा निवडणुकीत आमदारांना आपल्या गटात खेचण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच झाली आणि त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी घोडेबाजार होत असल्याची टीका केली. मात्र अपक्ष आमदार असलेल्या किशोर जोरगेवार यांनी राऊत यांच्या घोडेबाजार या शब्दावर नाराजी व्यक्त करत तर वेगळा विचार करू, अशी टोकाची भूमिका जोरगेवारांनी घेतली होती. जोरगेवारांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतली होती.

माझ्यासोबत ५० आमदार, आजच्या बैठकीत निर्णय घेऊ; एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले!

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून निरोप आला असल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली होती. शिवसेनेतून फुटून बाहेर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणखी काही आमदारांचे समर्थन भविष्यात अपेक्षित असल्याचा मोठा गौप्यस्फोट किशोर जोरगेवार यांनी केला होता. आता किशोर जोरगेवार शिंदे गटात सामील झाल्याने त्यांच्या या भूमिकेचे पडसाद मतदारसंघात कसे उमटतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here