नाशिक: नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांचा सायंकाळचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात आणखी १२ रुग्ण करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात मालेगावातील १०, सिन्नर आणि नाशिक शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात दिवसभरात करोनाचे २१ नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची आकडेवारी पाहता एकाच दिवसात आढळलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत.

नाशिक जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच असून, शनिवारी उच्चांकी २१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासन हादरले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवसात १४ रुग्णांची वाढ झाली होती. यातील नाशिकमध्ये ५, सिन्नरचा १, तर मालेगावातील १५ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९० वर पोहोचली आहे. यातील ७७ रुग्ण एकट्या मालेगावातील आहेत.

नाशिकमध्ये सुरुवातीला चार रुग्ण अंबड लिंक रोडवरील संजीवनगरमधील ६७ वर्षीय महिलेच्या संपर्कातील असल्याचे स्पष्ट झाले होते. संबधित महिलेच्या पुण्याहून आलेल्या मुलाकडूनच करोनाचा संसर्ग झाल्याचे आता स्पष्ट झाले असून, या मुलाचे वय ३७ वर्षे आहे. संबंधित मुलासह शेजारील भाडेकरू कुटुंबातील तीन जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात १४ वर्षीय मुलासह त्याच्या आईवडिलांचा (वय अनुक्रमे ३७, ४३) समावेश आहे. महिलेच्या संपर्कातील १५ जणांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर दोघांचे अहवाल प्रलंबित आहेत. नाशिकमधील पाचवा रुग्ण नाशिकरोड भागातील असून, तो यापूर्वी दाखल झालेल्या रुग्णाच्या संपर्कातला असल्याचे समोर आले आहे. सिन्नरमध्ये यापूर्वीच एक रुग्ण आढळला असताना, त्याच्या संपर्कातील आणखी एक रुग्ण शनिवारी आढळल्याने सिन्नरमध्ये रुग्णसंख्या दोनवर गेली आहे. मालेगावात आढळलेल्या १५ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पाच महिला, तर १० पुरुषांचा समावेश असून, ते सर्व १८ ते ५९ वयोगटातील आहेत. हे रुग्ण नयापुरा, आझादनगर, सरदारनगर, मुस्लिमनगर, बेलबाग, सिद्धार्थवाडी, कुसुंबारोड, मुस्लिमपुरा, मांड प्लॉट या भागातील आहेत.

४५ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

जिल्ह्यात वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या ४५ करोना सदृष्य रुग्णांचे अहवाल शनिवारी निगेटिव्ह आले. यापैकी २८ रुग्ण मालेगावातील रहिवासी असून, १७ नाशिक शहरातील असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. नाशिक शहरात आढळून आलेल्या गोविंदनगर परिसरातील पहिल्या बाधित रुग्णाचा स्वॅब नियमानुसार १४ दिवसांनंतर म्हणजेच १५ व्या दिवशी तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल शनिवारी सकाळी निगेटिव्ह आल्याने संबंधित रुग्ण, त्याचे निकटवर्तीय आणि प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे. यापूर्वी लासलगाव येथील रुग्ण बरा झाला होता. जिल्ह्यात एकूण १७५ संशयित रुग्णांचे अहवाल प्राप्त होणे बाकी असल्याची माहिती सिव्हिल हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिली.

मालेगावच्या पश्चिम भागातही करोनाचा शिरकाव

मालेगाव शहरातील करोनाचा कहर वाढत असून, १५ पैकी एक रुग्ण पश्चिम भागातील संगमेश्वरातील आहे. त्यामुळे पूर्व भागानंतर आता पश्चिम भागातही करोनाने शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी दिवसभरात आधी २८, तर नंतर ४ असे एकूण ३२ अहवाल निगेटिव्ह आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here