Eknath Shinde vs Shivsena | राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता येणार हे जवळजवळ निश्चित झाल्याने आता शिवसेनेला सुरुंग लावण्यासाठी शिंदे यांनी खासदारांना आपल्या गटात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेचे १८ खासदार आहेत. त्यामध्ये शिंदे यांच्या सुपुत्राचाही समावेश आहे. सत्तास्थापनेचा कार्यक्रम संपल्यानंतर अधिकाधिक खासदार या गटात कसे येतील याबाबत अधिक हालचाली होण्याची शक्यता आहे.

हायलाइट्स:
- शिंदे यांच्यासोबत तासातासाला आमदारांची संख्या वाढत आहे
- ४० पेक्षा अधिक आमदार त्यांच्या सोबत
- भाजप सोबत जाऊन हा गट उपमुख्यमंत्रीपदासह काही मंत्रिपदे पदरात पाडून घेऊ शकतो
राज्यात राजकीय भूकंपाला वेग आला आहे. रोज एक भूकंप होत असल्याने सध्या राजकारण उत्सुकतेच्या टप्प्यावर पोहोचले आहे. शिंदे यांच्यासोबत तासातासाला आमदारांची संख्या वाढत आहे. आता ४० पेक्षा अधिक आमदार त्यांच्या सोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे भाजप सोबत जाऊन हा गट उपमुख्यमंत्रीपदासह काही मंत्रिपदे पदरात पाडून घेऊ शकतो. येत्या चार-पाच दिवसांतच या घडामोडी होण्याची शक्यता आहे.
राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता येणार हे जवळजवळ निश्चित झाल्याने आता शिवसेनेला सुरुंग लावण्यासाठी शिंदे यांनी खासदारांना आपल्या गटात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेचे १८ खासदार आहेत. त्यामध्ये शिंदे यांच्या सुपुत्राचाही समावेश आहे. सत्तास्थापनेचा कार्यक्रम संपल्यानंतर अधिकाधिक खासदार या गटात कसे येतील याबाबत अधिक हालचाली होण्याची शक्यता आहे. सध्या धक्कातंत्राचा बाब म्हणून काही खासदारांना आपल्या गटात घेण्यासाठी शिंदे यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
त्यांच्या हाती राज्यातील चार खासदार लागल्याची चर्चा आहे. यामध्ये इडीची भीती असलेले भावना गवळी आणि प्रताप जाधव यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. त्यांनी कोणती जाहीर भूमिका घेतली नसली तरी भाजपसोबत जावे अशी इच्छा व्यक्त केल्याने शिंदे यांचे या दोघांना सोबत घेण्याचे काम बरेच हलके झाले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस सर्व खासदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतच राहण्याची सूचना केली होती. काल आपापल्या मतदारसंघात निघालेल्या खासदारांना रात्री तातडीने पुन्हा बोलावण्यात आले. आज सायंकाळी सात वाजता या खासदारांची बैठक बोलविण्यात आली आहे. खासदारांनी उघडपणे शिवसेनेशी सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर यातील अनेकजण नव्या सत्ताधारी पक्षाबरोबर जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी शिवसेना पातळीवर आता मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network