Shiv Sena : बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठं बंड करत एक गट घेऊन गुवाहाटी गाठली आहे. सत्तेतून बाहेर पडण्याचा पवित्रा घेत जवळपास 8 आमदार आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या निमित्ताने दोन तृतीअंशच्या नियमानं सर्वात मोठा गट कुणाचा आणि शिंदे मूळ शिवसेनेवर हक्क दाखवू शकतात का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंना बाजूला सारुन ताब्यात घेऊ शकतात का? याबाबत काँग्रेसचे पदाधिकारी प्रवीण बिराजदार यांचा एक ट्वीट थ्रेड सध्या व्हायरल होत आहे. या थ्रेडमध्ये त्यांनी शिवसेनेचं संविधान कागदपत्रांसह सांगितलं आहे. यामध्ये शिवसेना प्रमुखांचे अधिकार, निवडीचे अधिकार, प्रतिनिधी सभा यासह कार्यकारिणी निवडीच्या अधिकाराबाबत माहिती देण्यात आली आहे.
शिवसेनेच्या घटनेत “शिवसेना प्रमुख” हे पद सर्वोच्च
उद्धव ठाकरेंना बाजूला सारुन ताब्यात घेऊ शकतात का? तर सद्यस्थितीत ते अशक्यप्राय वाटतं. कारण, प्रत्येक पक्षाला एक घटना असते आणि त्यात नियम, अधिकार हे सुनिश्चित केलेले असतात, असं यात सांगण्यात आलेलं आहे. पक्षाने निवडणूक आयोगाला दिलेली घटना/संविधान हे अधिकृत असते. आता शिवसेनेच्या घटनेत “शिवसेना प्रमुख” हे पद सर्वोच्च आहे आणि फक्त शिवसेना प्रमुख यांनाच कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संगनमताने. आता शिंदे त्या पदावर बसू शकतात का? तर त्याचं उत्तर शिवसेनेच्या घटनेनुसार ‘नाही’ असंच आहे.
राष्ट्रीय कार्यकारणीच्या मंजुरीने शिवसेना प्रमुख काम करतात
यात महत्वाची बाब अशी की, शिवसेना प्रमुख हे प्रतिनिधी सभेचे सदस्य निवडून देतात. ज्यात फक्त आमदार , खासदार नसतात तर जिल्हा प्रमुख ते जिल्हा संपर्क प्रमुख ते मुंबईतील विभाग प्रमुखअसतात. 2018 मध्ये एकूण 282 जण होते ज्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमुखपदी निवडून दिले होते. म्हणजे ज्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या मंजूरीने शिवसेना प्रमुख काम करतात, त्या राष्ट्रीय कार्यकारणीतील 14 सदस्य हे पण प्रतिनिधी सभा निवडून देतात आणि जास्तीत जास्त 5 जणांची नियुक्ती ही शिवसेना प्रमुख करतात.
राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य कोण आहेत?
या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्यांना शिवसेनेत ‘पक्षनेते’ या नावाने ओळखलं जातं. 2018 मध्ये प्रतिनिधी सभेने खालील यादीतील 9 जणांना पक्षनेते म्हणून निवडून दिले. विशेष बाब म्हणजे यात एकनाथ शिंदे निवडून आले नाहीत, पण आदित्य ठाकरे आले. ही निवड 5 वर्षांसाठी असते.
1. उद्धव ठाकरे
2. आदित्य ठाकरे
3. मनोहर जोशी
4. सुधीर जोशी
5. लिलाधर डाके
6. सुभाष देसाई
7. दिवाकर रावते
8. रामदास कदम
9. संजय राऊत
10. गजानन किर्तीकर
शिवसेना प्रमुख यांच्या अधिकारानुसार ज्या 4 जणांना ते पक्ष नेते ( राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य) म्हणून नियुक्त करु शकतात.त्यानुसार त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह अनंत गीते, चंद्रकांत खैरे आणि आनंदराव अडसूळ या दोघांची जणांची नियुक्ती केली. ही नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार हे शिवसेना प्रमुखाकडे असतात.
आता जर मुख्य शिवसेना पक्ष जर शिंदेंना ताब्यात घ्यायचा असेल तर त्यांना प्रतिनिधी सभेतून निवडून यावं लागेल, त्यात 250 पेक्षा जास्त सदस्य आहेत. त्यांना सोबत घ्यावं लागेल तरच निवडणूक आयोग त्यांना मान्यता देऊन त्यांना शिवसेना पक्ष गृहीत धरू शकतो. आणि शिंदेंनी पक्षाची घटना बदलविण्याचा प्रयत्न केला तर अपयशी ठरतील. कारण शिवसेनेच्या घटनेत हे अधिकार राष्ट्रीय कार्यकारणीला देण्यात आले आहेत. जिथे शिंदे गटाचे संख्याबळ कमी आहे. त्यातही वाद झाला तर शिवसेना प्रमुखांचा निर्णय अंतिम असेल. त्यामुळे शिंदेना वेगळा गट, पक्ष काढण्यापलीकडे पर्याय दिसत नाही, असं बिराजदार यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे.
मित्रांनो,
मी काही कायदेशीर बाबी इथे मांडत आहे .एकनाथ शिंदे हे शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंना बाजुला सारुन ताब्यात घेऊ शकतात का ?
तर सद्यस्थितीत ते अशक्यप्राय वाटतं.
कारण,
प्रत्येक पक्षाला एक घटना असते आणि त्यात नियम, अधिकार हे सुनिश्चित केलेले असतात.(०१/०८) pic.twitter.com/rteRTSbiUC
— Pravinkumar Biradar (@PravinIYC) June 24, 2022