एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उरलेल्या शिवसेना नेत्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बैठकींचा सपाटा लावलाय. काल रात्री मुंबईतील सर्व शाखाप्रमुख आणि विभागप्रमुखांची बैठक घेतल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील सर्व शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांशी संवाद साधला. या बैठकीनंतर शिवसेना उपनेत्या यांनी प्रसारमाध्यमांना बैठकीबाबत माहिती दिली.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “शिंदे गट बाहेर गैरसमज पसरवत आहे. चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाकडे जाईल वगैरे वगैरे.. पण शिवसेनेची एक घटना आहे, जी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बनवली आहे. त्यामुळे विधिमंडळ पक्ष वेगळा आहे आणि मूळ पक्ष वेगळा आहे. त्यामुळे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना कुठल्यातरी गटात जावं लागेल, विलिन व्हावं लागेल. अन्यथा त्यांचा गट मूळ पक्षापासून विलिन झाला नाही तर त्यांना अपात्रतेमधून सुटका मिळणार नाही. थोडक्यात शिवसेना हे नाव त्यांना वापरता येणार नाही. शिंदे गटाला भाजप किंवा प्रहारमध्ये विलिन व्हावे लागेल”
जायचंय त्यांनी खुशाल जा, शिवसेनेला पुन्हा पालवी फुटेल!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षामध्ये उत्तम कामरभार केला. कोव्हिड काळातल्या त्यांच्या कारभाराची देशाने प्रशंसा केली. या काळात त्यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. निष्ठा काय असते याचं उदाहरण देताना मुख्यमंत्र्यांनी वामनराव महाडिकांचं उदाहरण दिलं, असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.
“माघ आणि फाल्गुन मासात झाडाची पाने गळतात. पण चैत्र महिन्यात झाडाला नवी पालवी फुटते, त्याप्रमाणे शिवसेना पक्ष पुन्हा बहरेल. त्यामुळे ज्या लोकांना जायचंय, त्यांनी खुशाल जावं, जाणाऱ्यांना मी अडवणार नाही. माझ्यासमोर येणाऱ्यांवर मी विश्वास ठेवेन”, असं भावनिक भाषण आज मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील सर्व शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांशी संवाद साधताना केलं.