शिर्डी विमानतळाची संरक्षक भिंत कोसळून कोसळून रन-वे वरील पाणी मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या शेती आणि वाड्या वस्त्यांमध्ये घुसल्याने शेताकडे आणि घरांकडे जाणाऱ्या रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेतातील विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात माती गेल्याने विहिरी बुजण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील उभी पिके वाहून गेली असून शेती पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. विमानतळ प्राधिकरणाने याची जबाबदारी घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
विमानतळाची संरक्षक भिंत पडण्याची ही तिसरी घटना आहे. यापुर्वीही दोनदा विमानतळाची संरक्षक भिंत कोसळली होती. संरक्षक भिंतींचे काम चालु असताना स्थानिकांकडून हे काम निकृष्ठ होत आसल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, तेव्हाच्या आधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. संरक्षक भिंत पडल्यामुळे या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सातत्याने संरक्षक भिंत कोसळत असताना विमानतळ विकास प्राधिकरण त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अगदी निकृष्ठ पध्दतीने या संरक्षक भिंतीचे काम करण्यात आले असल्याचं पाहिल्यानंतर सर्वसामान्यांच्या लक्षात येते. मात्र, विमानतळ प्राधिकरणाच्या हे लक्षात येत नाही हे विशेष आहे. विमानतळ सुरु झाल्यानंतर सर्वाधिक पसंती या विमानतळास मिळाली. मात्र, प्रवाशांच्या सोयीच्या बाबतीत नेहमीच हे विमानतळ चर्चेत असते. अनेक वेळा उन्हाळ्यात प्रवाशांना वातानुकुलीत यंत्रणाही कमी पडत होत्या.