जिल्हा गोपनीय शाखेत साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असणाऱ्या छगन सोनवणे यांची काही महिन्यांपूर्वी चुडावा पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली होती. शुक्रवार २४ जून रोजी ते कामानिमित्त खाजगी वाहन एम एच १२ टी वाय ३७१२ या क्रमांकाच्या गाडीने पूर्णाकडे जात होते. सायंकाळच्या सुमारास त्यांची गाडी महामार्ग वरील नऱ्हापूर शिवारात आली असता त्यांच्या कारचा दुचाकीसोबत अपघात झाला. या अपघातात त्यांची गाडी थेट रस्त्याखाली जाऊन शेतात कोसळली त्यामुळे गाडीचा चेंदामेंदा झाल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्राव झाल्याने जमलेल्या लोकांनी छगन सोनवणे यांना रुग्णवाहिकेतून पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच पोलिस ठाण्याचे ठाणेदार गुलाब बाचेवाड यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असणाऱ्या छगन सोनवणे यांची पोलिस उपनिरीक्षक म्हणून बढती झाली होती. पोलीस अधीक्षक यांनी १७ जून रोजी काढलेल्या आदेशामध्ये त्यांचे नाव होते. बडती मिळाल्याने सोनवणे आनंदी होते. मात्र, अचानक त्यांच्यावर काळाने झडप घातली. अपघातात निधन झाल्याने फौजदार म्हणून कर्तव्य पार पाडण्याची सोनवणे यांचे स्वप्न अधूरेच राहिलं. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.