मुंबई : “आज जर बंडखोर आमदारांनी गट स्थापन केला. उद्या-परवा-दोन महिन्यांनी गट फुटला तर बाकीचे अपात्र होणार आहेत. हा धोका त्यांनाही (एकनाथ शिंदे) माहितीये. कारण सरकार स्थापन झालं तरी हे फार काळ टिकणार नाही. या सगळ्या गटाला भाजपमध्ये जावं लागेल. एकाबाजूला शिवसेना संपवायची आणि भाजपची वाढ करायची, हे त्यांचं हिंदुत्व आहे. ही यांची मैत्री आहे. आज जे बंडखोर निघून गेले आहेत. त्यानंतर सगळे शिवसैनिक जसे एकवटून उभे राहिले आहात, तसे जर निवडणुकीच्या काळात उभे राहिलात, तर बंडखोर आमदार पुन्हा निवडून येतील काय?”, असं चॅलेंजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना दिलं.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात आणखी पडझड होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी संवाद साधला. यानंतरची शिवसेनेची पावलं कशी असतील, याबाबत शिवसेना नगरसेवकांना विस्तृत मार्गदर्शन केलं. आजच्या मार्गदर्शनावेळीही उद्धव ठाकरे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. “ज्या मातोश्रीला तुम्ही मंदिर मानता, त्याच मातोश्रीवर, ठाकरे कुटुंबावर ज्या भाजपने यथेच्छ चिखलफेक केली, त्यांच्याबरोबर तुम्हाला जायचं आहे का? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर मीच हे बंड करायला लावलं, असा खोडसाळ प्रचार शिंदे करत असल्याचा आरोप करत मी माझ्या शिवसेनेच्याच पाठीवर वार कशाला करेल, मी कधीही असं षंडासारखं काम करणार नाही, कारण माझ्या अंगात शिवसेनाप्रमुखांचं रक्त आहे. माझ्या शिवसैनिकांच्या पाठीत वार करणारी माझी औलाद नाही. या बंडाला माझी फूस नाही. जसा महाविकास आघाडी स्थापन करण्याचा मी उघड निर्णय घेतला, तसा आताही घेतला असता”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

माझी बदनामी करा, पण माझं कुटुंब आणि मातोश्री या मंदिराला काळिमा फासू नका : उद्धव ठाकरे
“मुख्यमंत्री म्हणून मी काय सुख भोगलंय, कधी आनंद उपभोगला. मला सहानुभूती नाही कमवायची, पण ते निमित्त करुन तुम्ही फुटत असाल तर सांगा. जी मंत्रिपदं, मोकळेपणा शिवसेनेत मिळाला, ती तिकडे जाऊन मिळणार आहे का? मी खात्यात कधीच लुडबूड केली नाही. हे स्वातंत्र्य भाजपसोबत मिळत असेल तर खुशाल जा. उपमुख्यमंत्रीच होणार असाल, तर सांगायचं होतं, मी केलं असतं…” असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता लगावला.

“एका पत्रकाराने मला सांगितलं, शिवसेना युतीत आळसावते. शिवसेना तलवारीसारखी आहे. म्यानात गंजते, बाहेर काढली की तळपते. सध्याच्या डाव हा शिवसेना संपवण्याचा डाव आहे. हिंदू मतं फोडण्याचं पाप काही लोक करतायत. पण तुम्ही सगळे सोबत असाल तर पुन्हा नव्या जोमाने शिवसेना पक्ष उभा करेन”, अशा आशावाद उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या नगरसेवकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

जड आवाज, खोकल्याची ढास, पण ठाकरी बाणा कायम, करोनाग्रस्त मुख्यमंत्र्यांचं शिवसैनिकांना ‘सलाईन’
नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या होत्या?

बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना कुठल्यातरी गटात जावं लागेल, विलिन व्हावं लागेल. अन्यथा त्यांचा गट मूळ पक्षापासून विलिन झाला नाही तर त्यांना अपात्रतेमधून सुटका मिळणार नाही. थोडक्यात शिवसेना हे नाव त्यांना वापरता येणार नाही. शिंदे गटाला भाजप किंवा प्रहारमध्ये विलिन व्हावे लागेल, असं वक्तव्य शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलं.

निवडून आलेल्यांना फोडू शकाल, पण निवडून देणाऱ्यांना कसे फोडाल? उद्धव ठाकरेंचं ओपन चॅलेंज
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “शिंदे गट बाहेर गैरसमज पसरवत आहे. चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाकडे जाईल वगैरे वगैरे.. पण शिवसेनेची एक घटना आहे, जी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बनवली आहे. त्यामुळे विधिमंडळ पक्ष वेगळा आहे आणि मूळ पक्ष वेगळा आहे. त्यामुळे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना कुठल्यातरी गटात जावं लागेल, विलिन व्हावं लागेल. अन्यथा त्यांचा गट मूळ पक्षापासून विलिन झाला नाही तर त्यांना अपात्रतेमधून सुटका मिळणार नाही. थोडक्यात शिवसेना हे नाव त्यांना वापरता येणार नाही. शिंदे गटाला भाजप किंवा प्रहारमध्ये विलिन व्हावे लागेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here