शिंदे गटाचा मुक्काम असलेल्या गुवाहाटीमधील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पदाधिकारी टेहळणी करताना दिसले. हे दोन्ही पदाधिकारी खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात. कुशल करंजावणे आणि सुहास उभे अशी दोघांची नावं आहेत. करंजावणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सचिव आहेत, तर उभे हे राज्य समन्वयक आहेत. दोघेही रॅडिसन ब्ल्यू परिसरात दिसून आले. त्यामुळे या दोघांवर पक्षानं काही खास जबाबदारी दिली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा शिंदेंचा दावा केला आहे. ठाकरेंसोबत असलेले अनेक आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. सुरुवातीला शिंदेसोबत ग्रामीण भागातील आमदार होते. शिंदेकडे असलेलं संख्याबळ वाढू लागताच मुंबई, कोकण पट्ट्यातील आमदारदेखील त्यांच्या गटात गेले. २४ तासांत परत या, महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तुमच्या मागणीचा विचार करू, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली होती. मात्र २४ तास उलटल्यानंतरही आमदारांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आता सेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करणाऱ्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं अशा आशयाची मागणी शिवसेनेकडून विधावसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. या १६ आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे. या आमदारांनी त्यांचं मत न मांडल्यास त्यांना अपात्र ठरववलं जाईल, असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले. आता बंडखोरांना शिवसेनेचं कवच सोडावं लागेल. आजपासून सर्वांना नोटिसा जातील. त्यांना बाजू मांडण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ आहे. त्यांना नोटिशीला उत्तर द्यावं लागेल, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं.
शिवसेनेनं १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी प्रस्ताव दिला होता. त्यावर चार तास चर्चा झाली. अखेर रात्री सव्वा आठच्या सुमारास महाधिवक्ता विधान भवनात दाखल झाले. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि इतर नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली. या बैठकीत बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी नोटीस काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बंडखोर आमदारांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना २ दिवसांचा अवधी मिळेल. त्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.
एकनाथ शिंदेंची ताकद वाढली; शिवसेनेचा आणखी एक आमदार गुवाहाटीत दाखलं