नवी दिल्ली :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारविरुद्ध शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीमुळे गेल्या चार दिवसांपासून सत्तांतराचे अभूतपूर्व संकट उद्भवले असताना त्यांना सातत्याने लक्ष करणारे केंद्रातील आणि राज्यातील भाजप नेते इतके शांत का, याविषयी दिल्लीतील राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदाची सूत्रे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या हाती जाणार हे जवळजवळ निश्चित झाले असतानाही भाजपच्या गोटात कमालीची शांतता आहे.

राज्यात नोव्हेंबर २०१९ पासून सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरे सरकारविरुद्ध केंद्रातील आणि राज्यातील भाजप नेत्यांनी आगपाखड करण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही. असे असतानाही ठाकरे राजकीय जीवनातील सर्वांत मोठ्या संकटात सापडले असताना दिल्ली आणि मुंबईतील भाजप नेत्यांनी मौन बाळगले आहे. भाजपश्रेष्ठींशी महत्त्वाची चर्चा करण्यासाठी चार दिवसांत दोनवेळा दिल्लीत येऊन गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्लीतील माध्यमांशी बोलणे टाळले आहे. ऑपरेशन पूर्णत्वाला जाईपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही, अशी सूचना सर्व भाजप नेत्यांना देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

एकनाथ शिंदेंबद्दल शिवसेना मोठा निर्णय घेणार?; ठाकरेंनी बोलावली ‘पॉवरफुल’ बैठक

बुचकळ्यात टाकणारे प्रश्न

– प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडीवर त्वरित प्रतिक्रिया देणारे राज्यातील आणि दिल्लीतील भाजपचे नेते महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या राजकीय उलथापालथीबाबत भाष्य का करीत नाहीत?

– आपल्या सर्वोच्च नेत्यावर एवढे मोठे राजकीय संकट ओढवूनही शिवसेनेच्या गोटातही कमालीची शांतता का पाळली जात आहे?

शिंदेचे दिग्दर्शक दिल्लीतच

उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड करण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांना चिथावणी देणारे एकनाथ शिंदे दिल्लीच्या दिग्दर्शनानुसारच वागत आणि बोलत आहेत, याविषयी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मनात शंका नाही. शिंदे यांच्या बंडखोरीचे ‘ऑपरेशन’ दिल्लीतून संचालित होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस वगळता राज्यातील एकाही भाजप नेत्याला नव्हती, असे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here