मुंबई : बंडखोर एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्यावर निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी शुक्रवारीसंध्याकाळी सुमारे दोन तास झालेल्या बैठकीत बंड मोडीत काढण्यासाठी आक्रमक पवित्रा घेण्याचे उभय नेत्यांमध्ये ठरल्याचे सूत्रांकडून समजते.

आसामच्या गुवाहाटीमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आश्रय घेतलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपैकी सुमारे १६ आमदारांवर पक्षशिस्त मोडल्याची शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यास संसदीय मार्गाने कायदेशीर पद्धतीने पुढचा मार्ग अवलंबिण्यात यावा. तसेच शिवसेनेने ही लढाई आता रस्त्यावरही करावी, असे या बैठकीत निश्चित झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तथापि, ही बैठक आटोपल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अन्य नेत्यांनी यासंदर्भात पत्रकारांशी काहीही बोलण्यास नकार दिला.

एकनाथ शिंदेंबद्दल शिवसेना मोठा निर्णय घेणार?; ठाकरेंनी बोलावली ‘पॉवरफुल’ बैठक

उभय नेत्यांमध्ये मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. प्रफुल पटेल, शिवसेनेचे नेते खा. अनिल देसाई, खा. संजय राऊत आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या खासदारांसोबत बैठक घेणार आहेत. बंडाचे निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात सामील झालेल्या सेनेच्या फुटीर आमदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांनी रस्त्यावरची लढाई सुरू करावी, यावर एकमत झाल्याचे समजते.

शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या विरोधात कायद्याचा बडगा उगारताना या प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त कालावधी लागणार आहे. हा कालावधी लांबत गेल्यास बंडखोर आमदार यांच्यावर दबाव निर्माण होईल. शिवसेनेच्या बंडखोर १६ आमदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कायद्याच्या बाजू तपासण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात पुढील कारवाईसाठी अॅडव्होकेट जनरल यांचेही कायदेशीर मत मागविण्यात आल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here