करोनाच्या संशयावरून काही लोकांना आमदार निवासात क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्यापैकी ९ जणांचे आज रिपोर्ट आले असून हे नऊजण पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. या ९ पैकी ५जण शांतीनगर परिसरातील असून हा परिसर सील करण्यात येत आहे. तसेच या ९ रुग्णांच्या कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनाही क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच या बाधितांच्या कुटुंबीयांचे स्वॅब घेतले जात असून त्यांनाही करोनाची लागण झाली की नाही? याची तपासणी करण्यात येत आहे. शिवाय हे नऊ रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात होते, याचा तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, नऊ नवे करोना रुग्ण सापडल्याने नागपूर महानगर पालिका क्षेत्रातील करोना रुग्णांची संख्या ६७वर गेली आहे. तर राज्यात शनिवारी ३२८ नवे करोनाबाधीत रुग्ण सापडल्याने राज्यातील करोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या ३६४८ झाली आहे. तर काल दिवसभरात ३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३६५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या एकूण ३०७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांमध्ये मुंबईत सर्वाधिक २२६८ रुग्णांची नोंद झाली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times