मुंबई: एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. या बंडखोर आमदारांना जेवणातून गुंगीचे औषध दिले जात असल्याचा संशय मिटकरी (Amol Mitkari) यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या आमदारांना आपण काय बोलतोय किंवा करतोय, याची जाणीवर नसल्याचा गंभीर आरोप मिटकरी यांनी केला. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अमोल मिटकरी यांनी हा दावा केला. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या गोटातून परतलेले आमदार नितीन देशमुख यांनीदेखील आपल्याला जबरदस्तीने इंजेक्शन दिल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता अमोल मिटकरी यांच्या या नव्या दाव्यामुळे रॅडिसन हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेना बंडखोरांच्या सुरक्षिततेबाबत महाविकास आघाडीकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. (Shivsena rebel MLA’s in guwahati radisson hotel)

काही तासांपूर्वीच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांची आपला गटनेता म्हणून निवड केली होती. या प्रसंगाची एक व्हिडिओ क्लीपही प्रसिद्ध झाली होती. याच क्लीपचा दाखला देत अमोल मिटकरी यांनी म्हटले की, या व्हिडिओत शिंदे साहेबांचा विजय असो, असे बोलताना समोर बसलेल्या काही आमदारांचे हात खाली असल्याचे दिसत आहेत. मी हा व्हिडिओ माझ्या ओळखीतील एका मानसोपचार तज्ज्ञांना दाखवला आणि त्यांचे मत विचारले. तेव्हा त्यांनी या आमदारांना गुंगीचे औषध दिले जात असावे, अशी शक्यता बोलून दाखवली. कदाचित या आमदारांना जेवणातून गुंगीचे औषध दिले जात असावे. त्यामुळे जेवणानंतर या आमदारांच्या स्मरणात काहीही राहत नसावे. आपण काय करतोय किंवा बोलतोय याचे भान या आमदारांना नसेल, असे मिटकरी यांनी म्हटले. ही गोष्ट संबंधित आमदारांच्या कुटुंबीयांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावी,असे आवाहनही अमोल मिटकरी यांनी केले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून या आरोपाला काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचं बंड निर्णायक टप्प्यावर, आता उरले ‘हे’ दोनच पर्याय

संघ प्रवृत्तीला संविधानाने प्रत्यु्त्तर देऊ: मिटकरी

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी या सगळ्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. मात्र, भाजपचे हे कारस्थान आम्ही उधळून लावू, असे मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटले आहे. अमोल मिटकरी यांनी शुक्रवारी यासंदर्भात ट्विट करून भाष्य केले. भारतीय जनता पार्टीने घडवून आणलेल्या कपटकारस्थानाला भारतीय राज्यघटना उधळून लावणार. संघ प्रवृत्तीला भारतीय संविधान जोरदार उत्तर देणार . कपट कारस्थान यशस्वी होणारच नाही.भारतीय संविधानाचा विजय असो, असे मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here