मंत्री गटाच्या (जीओएम) बैठकीत यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाचे मत आल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. आताच्या परिस्थितीत जीओएम सध्या प्रवासी गाड्या सुरू करण्याच्या बाजूने नसल्याची सूत्रांची माहिती आहे. गाड्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन होणे शक्य नसल्याचे मंत्रिगटाचे म्हणणे आहे. या बरोबरच, एअर इंडिया आणि अन्य खासगी विमान कंपन्यांना ३ मे नंतर बुकिंग करायचे की नाही ते सरकारने त्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतरच स्पष्ट होईल, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
देशातील करोनाची परिस्थिती पाहता देशांतर्गत उड्डाणे आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे लवकर सुरू होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट होत आहे. एअर इंडिया आणि इंडिगो यांनी ४ मेपासून उड्डाण सुरू करण्याचा विचार व्यक्त केला आहे. दरम्यान, सरकारने या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. म्हणूनच सरकारने प्रवासी विमानांना ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच तिकिटांचे बुकिंग सुरू करा, असे नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी शनिवारी विमान कंपन्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.
पुरी यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याबाबत नागरी उड्डयन मंत्रालयाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरकारने तसा निर्णय घेतल्यानंतरच विमान कंपन्यांनी बुकिंग सुरू करावे.’
कोरोनाव्हायरसच्या धोका लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे २०२० पर्यंत देशभरात वाढविण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाउन लक्षात घेता भारतीय रेल्वेने ३ मे पर्यंत सर्व प्रवासी रेल्वे सेवा रद्द करण्याचे निर्देश जारी केले होते. भारतीय रेल्वेने दिलेल्या निर्देशानुसार प्रीमियम गाड्या, मेल / एक्स्प्रेस गाड्या, प्रवासी गाड्या, उपनगरी गाड्या, कोलकाता मेट्रो रेल्वे, कोकण रेल्वे इत्यादी सर्व प्रवासी रेल्वे सेवा ३ मे २०२० पर्यंत चोवीस तास रद्द राहतील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times