चाळीसगावमध्ये भाजपचे खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदोरीकर महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी इंदोरीकर महाराज यांनी राजकीय घडामोडीवर जोरदार बॅटिंग केली. यावेळी इंदुरीकर महाराजांनी राजकारण्यांवर खोचक शैलीत निशाणा साधला. ज्यांच्याकडे तालुके आहेत, त्यांना शिकवावं लागतं, मतदान कसं करायचं. त्यांची तीनवेळा बैठक घ्यावी लागते. ‘झाकली मूठ सव्वा लाखाची आंधळे दळत आणि कुत्रं पीठ खातं’ असा टोला कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी आमदारांना लगावला.
आज जे चाललंय ते पंचांगने सांगितले होते. कालचं आणि आजचं जे सांगितलं होतं ते पंचागामध्ये सांगितलं होतं. कुणाला आमदार म्हणावे हेच कळत नाही, जनतेचा भरडा झाला आहे. दोन दिवस झाली तुकोबांच्या पालखीची बातमी दिसत नाही. माऊलींची पालखी पुण्यातून निघाली बातमी दिसत नाही. पाऊस पडला आहे, शेतकऱ्यांना बियाणं भेटत नाही, तो हवालदिल झाला आहे. पण, कुणालाच काही फरक पडत नाही.कुणीही दखल घेत नाही, अशी टीकाही यावेळी इंदुरीकर महाराजांनी केली.
ठाकरे सरकार आणि एकनाथ शिंदेंमध्ये शाब्दिक युद्ध
शिवसेनेचे तब्बल ४० आमदार गळाला लावून संपूर्ण पक्षच आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ शिंदे यांन गुवाहाटीतून एक नवे ट्विट केले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे सरकारने आपल्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप केला आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे आता शाब्दिक वाद रंगण्याची शक्यता आहे.