सावंतवाडी (): लॉकडाऊनमुळे लग्न सोहळ्यांवर मर्यादा आल्या असल्या तरी लग्नोत्सुक मंडळी कुठे नियम मोडून तर कुठे नियमांचे काटेकोरपणे पालन करून सप्तपदी चालत आहेत. नियम मोडणाऱ्यांना पोलिसांकडून कायद्याचा बडगा दाखवला जातोय तर जे नियम पाळताहेत त्यांचं तितकंच कौतुकही होतंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात पार पडलेला एक असाच अनोखा लग्नसोहळा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

सावंतवाडीपासून जवळच असलेल्या बांदा शहरातील महालक्ष्मी मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचं वैशिष्ट्य म्हणजे वधू, वर, पुरोहित आणि वऱ्हाडी म्हणून वराचा एक जवळचा मित्र असे चौघेच या लग्नाला उपस्थित होते. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून तहसीलदारांकडून रितसर परवानगी घेऊन हा विवाह सोहळा पार पाडण्यात आला. वधू आणि वर दोघांनीही मास्क घालूनच एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली. वऱ्हाडी आणि वाजंत्र्यांशिवाय पार पडलेल्या या लग्नाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाइकवरून हे नवदाम्पत्य आपल्या इन्सुली गावातील घरी पोहचलं. हीच त्यांची वरात ठरली.

…आणि लग्नाला मिळाली परवानगी

इन्सुली गावातील गावकरवाडी येथे राहणारा तरुण स्वप्नील दीपक नाईक याचं लग्न तालुक्यातीलच सातार्डा येथील रसिका मनोहर पेडणेकर हिच्याशी महिनाभरापूर्वी ठरलं होतं. एप्रिलमध्ये शुभमुहूर्तावर हे लग्न पार पाडायचं, असा दोघांच्याही घरच्यांचा विचार होता. मात्र त्यात करोना साथीचं विघ्न आलं. करोनामुळे सरकारने लॉकडाऊन जारी केले आणि हा विवाह सोहळा लांबणीवर टाकावा लागला. दरम्यान, राज्यात आणि देशात लागू करण्यात आलेले लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याने रितसर परवानगी घेऊन नियमांच्या चौकटीत राहून हे लग्न पार पाडता येईल का यासाठी धडपड सुरू झाली. त्यातून सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आणि तहसीलदारांनीही कोणती आडकाठी आणली नाही. त्यांनी या लग्नाला परवानगी दिली व फक्त पाच जणांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळून हे लग्न पार पाडता येईल, असे सांगितले. ही अट मान्य करत स्वप्नील व रसिका या दोघांनीही मान्य केली आणि बांदा येथे हा विवाह पार पडला. वधुवरांवर अक्षता टाकायला भटजीबुवा आणि वराचा मित्र हेमंत वागळे हे दोघेच होते. हे अनोखं लग्न सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या सर्वांचेच डोळे उघडणारं आहे.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here