तानाजी सावंत यांनी त्यांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना इशारा दिला आहे. आमचे गटनेते मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं, असे तानाजी सावंत यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता यावर शिवसैनिक आणखी चवताळणार का, हे पाहावे लागेल.
शिवसैनिकांनी आज पुणे आणि उस्मानाबादमधील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. ‘ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी याठिकाणी हल्लाबोल केला. ही तोडफोड नेमकी कोणी केली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. यानंतर तानाजी सावंत आणि त्यांचे कात्रज येथील मुख्य कार्यालय आणि आणि घराबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
‘गद्दारांना वेचून वेचून धडा शिकवणार’
तानाजी सावंत यांच्या कार्यालयातील काचा आणि इतर सामानाची नासधूस करण्यात आली. यानंतर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी या कृत्याचे समर्थन केले आहे. आता शिवसेना अशाचप्रकारे गद्दारांना ‘वेचून वेचून धडा शिकवणार’ असा इशाराही दानवे यांनी दिला. शिवसैनिकांनी या आमदारांना रक्ताचं पाणी करून निवडून दिले होते. पण त्यांच्याशी कोणताही विचारविनिमय न करता अशा पद्धतीने आमदार पक्षाच्याविरोधात जात असतील, बंडखोरी करणार असतील तर शिवसैनिकांच्या भावना कोणीही दाबून ठेऊ शकत नाही. येणाऱ्या काळात शिवसैनिक हे आणखी आक्रमक होतील, असे अंबादास दानवे यांनी म्हटले.
अंबादास दानवे यांनी शिवसैनिक सर्वच बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक होणार नाहीत, असेही सांगितले. आम्ही निवडून-निवडून एकएकाला लक्ष्य करत आहोत. कोण पक्षात पुन्हा येऊ शकतं आणि कोण नाही, हे आम्हालाही माहिती आहे. त्यामुळे आता आम्ही वेचून वेचून बंडखोरांमधील गद्दारांना धडा शिकवायला सुरुवात केली आहे, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.