मुंबई : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचं मन वळविण्याचा पुरेपूर प्रयत्न शिवसेना नेतृत्वाकडून झाला. पण काही केल्या शिंदे माघारी फिरायला तयार नाहीयेत. त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा केली. पण ते माघारी यायला तयार नाहीयेत. त्यांना कालपर्यंत मुदत होती. त्यांचं मंत्रिपद काढण्याविषयी पुढच्या २४ तासांत निर्णय घेतला जाईल, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

“शिवसेना ही त्यांची आई आहे. त्यांनी यायला हवं होतं. पण आता त्यांची वेळ निघून गेली आहे. त्यांना काही गोष्टींची लालुच लागली आहे. काही आमिषं दाखवली जात आहेत. आताचं बंड सत्तेतील अधिक वाटा मिळावा, यासाठीचं आहे. महत्वकांक्षा, लालूच आणि आमिष या तीन गोष्टींमुळे सध्याचं बंड आहे. सध्या गुवाहाटीमध्ये असलेल्या निम्म्यापेक्षा अधिक लोकांचा हिंदुत्वाशी काडीमात्र संबंध नाहीये. पण असो ज्यांना जायचंय, त्यांना थांबवू शकत नाही. आम्ही पुन्हा शिवसेना पक्ष उभा करु”, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदे यांच्यासह ७ जणांचं मंत्रिपद धोक्यात, २४ तासात कारवाई होणार?
“एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. हिंदुत्व वगै हे सगळं बहाणा आहे. यांचं कारणं म्हणजे केवळ फोडणी आहे. मी एकनाथ शिंदे यांना सांगू इच्छितो, तुम्हाला मुख्यमंत्री करण्यापासून भाजपनेच. जर भाजपने 2019 मध्ये शब्द पळाला असता तर उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होते. भाजपने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही आणि आता त्याच भाजपसोबत एकनाथ शिंदे जायला निघाले आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल

हिम्मत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आधी दास होते, आता नाथ झाले, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

‘शिवसेनेत हिंदुत्त्वाचा आग्रह म्हणजे बंडखोरी कशी?’ मंत्री संदिपान भुमरेंचा सवाल
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवनात पार पडत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, मंत्री अनिल परब, शिवेसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते. याच कार्यकारिणी बैठकीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला.

बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरु नका. हिम्मत असेल तर स्वत:च्या बापाचं नाव वापरुन मतं मागा. आधी दास होता, आता नाथ झाला, अशा कडक शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. बंडखोरांना काय तो निर्णय घेऊ द्या, मग आपण आपली रणनिती ठरवूयात. शिवसैनिकांनी अशीच एकजुट दाखवा. आपण त्यांना धडा शिकवू. शिवसेना निखारा आहे, बंडखोरांनी पाय ठेवला तर जळून जातील, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here