मुंबई: शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना आणि महाविकास आघाडीला अडचणीत आणलं आहे. गेल्या चार दिवसांपासून शिंदे आणि समर्थक आमदारांचा मुक्काम गुवाहाटीत आहे. शिवसेना आणि शिंदे गट यांच्याकडून कायदेशीर आणि तांत्रिक मुद्द्यांवर बॅटिंग सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संघर्षाचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाला दीर्घ काळ लढत देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे.

आमच्यासोबत ४६ आमदार आहेत. पक्षाचे दोन-तृतीयांशपेक्षा अधिक आमदार माझ्यासोबत असल्यानं आमचा गट म्हणजेच शिवसेना असं म्हणत शिंदेंनी थेट पक्षावरच दावा सांगितला. त्यामुळे आता पक्ष वाचवण्यासाठी ठाकरेंनी संघर्ष सुरू केला आहे. पक्षाच्या विविध आघाड्या आणि संघटनांसह शिंदे गटाशी दोन हात करण्याची योजना सेनेनं आखली आहे. पुढील काही दिवसांमध्ये शिवसेनेचे नेते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील. विविध जिल्ह्यांचे दौरेही केली जातील.
आता शिंदेंसमोर फक्त अन् फक्त एकच पर्याय शिल्लक; कायदेतज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं
शिवसेनेच्या संघटनेला बळ देण्याची जबाबदारी अनिल देसाई, सुभाष देसाई, अनिल परब, सुनिल प्रभू यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या आव्हानाचा मुकाबला करायचा निर्धार पक्षानं आणि नेतृत्त्वानं केल्याचं सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं सांगितलं. ‘सुरुवातीला पक्षाचं नेतृत्त्व उदास होतं. मात्र आता संघर्ष करायचं ठरलं आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत झालेल्या ठरावांमधून ते स्पष्ट होतं. आम्ही बंडखोरांचा मुकाबला पूर्ण ताकदीनिशी करणार आहोत. त्यांच्या मतदारसंघात असलेले शिवसैनिक, पदाधिकारी, संघटना आमच्याच सोबत राहील, याची काळजी घेतली जाईल. आम्ही न्यायालयात लढू, रस्त्यावर संघर्ष करू आणि विधानसभेतही मुकाबला करू. सर्व आघाड्यांवर संघर्ष करू,’ असं या पदाधिकाऱ्यानं सांगितलं.
बंडखोर आमदारपुत्रांची धाकधूक वाढली; युवासेनेच्या बैठकीत अनेक ठरावांची शक्यता
मुख्यमंत्री ठाकरे एक दिवस आड पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे राज्यातील अनेक शहरांचे दौरे करणार आहेत. मेळावे घेणार आहेत. कालच दक्षिण मुंबईत त्यांनी पहिला मेळावा घेतला.

भारतीय कामगार सेना, युवासेना अशा शिवसेनेच्या अनेक संघटना आहेत. या संघटना अद्यापही शिवसेनेसोबतच आहेत. शिवसेनेचे अनेक शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख सध्या कुंपणावर आहेत. बंडखोरांचं बंड कुठपर्यंत जातं याकडे त्यांचं लक्ष आहे. अशा परिस्थितीत त्यांना पक्षासोबत ठेवण्यासाठीचे प्रयत्न नेतृत्त्वानं सुरू केले आहेत. आमदारांनी बंड केलं असलं पक्षावरील पकड घट्ट ठेवण्यासाठी नेतृत्त्व प्रयत्नशील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here