संजय राऊत यांनी ट्विट करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाना साधला आहे. राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही, पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवत येत आहे. समझनेवालों को इशारा काफी है!, अशी टीका राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळण्यास २८ मे रोजी ६ महिने पूर्ण होत आहेत. त्यापूर्वीच त्यांना विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. मात्र विधानपरिषदेच्या ९ जागांसाठीच्या निवडणुका करोनामुळे पुढे ढकलण्यात आल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोरची डोकेदुखी वाढली आहे.
मात्र, विधानपरिषदेसाठीच्या राज्यपाल नियुक्त दोन जागा रिक्त आहेत. त्यातील एका जागेसाठी मंत्रिमंडळाने उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस केली आहे. मात्र, ११ दिवस उलटले तरी त्यावर राज्यपालांनी निर्णय घेतलेला नाही. राज्यपालांना या दोन रिक्त जागा तात्काळ भरण्याचे घटनात्मक बंधन नसल्याने ठाकरे यांच्यासमोरी संकट आणखी गडद झाले आहे. त्यामुळे राज्यपाल राजकारण करत असल्याची टीका होत असतानाच राऊत यांनीही राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, असा इशारा दिला आहे.
काय आहे रामलाल प्रकरण?
आंध्रप्रदेशात ८०च्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री एन. भास्कर राव यांना तत्कालीन राज्यपाल रामलाल यांनी मुख्यमंत्री नेमले होते. त्यावेळी रामाराव हे अमेरिकेत उपचारासाठी गेलेले होते. त्यांच्या गैरहजेरीचा फायदा उचलत रामलाल यांनी अवघ्या २० टक्के सत्ताधारी आमदारांचा पाठिंबा असलेल्या भास्कर राव यांना मुख्यमंत्री केल्याने आंध्र प्रदेशात रोष निर्माण झाला होता. तुमचा निर्णय अन्यायकारक असून मी बहुमत सिद्ध करायला तयार आहे, असं रामाराव यांनी रामलाल यांना सांगूनही त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे रामाराव यांनी रस्त्यावरचं आंदोलन सुरू केलं. त्यामुळे तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी हस्तक्षेप करत रामलाल यांना राज्यपाल पदावरून हटवलं आणि रामाराव पुन्हा मुख्यमंत्री झाले. राऊत यांनी रामलाल प्रकरणाची आठवण करून देत राज्यपाल कोश्यारींना इशारा तर दिला नाही ना? अशी चर्चा आता होत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times