ठाणे : ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील चंदनवाडी शाखेच्या बाहेर शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरवर काळं फासल्याची घटना घडली आहे. ठाण्यात घडलेल्या या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरोधात निदर्शने केली. तर ठाण्यात मात्र बॅनरबाजी करून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर काल ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील चंदनवाडी येथील शिवसेना शाखेबाहेर उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ पहिला बॅनर झळकला. परंतु या बॅनरला काळं फासल्याची घटना घडली आहे.

श्रीकांत शिंदे यांच्या निशाण्यावर थेट उद्धव ठाकरे, म्हणाले, शिंदे साहेबांना ५० आमदारांचा पाठिंबा

शाखेबाहेर काय घडलं?

चंदनवाडी येथील शिवसैनिकांनी रात्री उशिरा शाखा बंद केली आणि ते आपआपल्या घरी गेले. मात्र, त्यानंतर काही तरूण तिथे आले आणि त्यांनी शाखेबाहेर लावलेल्या बॅनरच्या मजकुरावर काळा रंग फासून पोबारा केला. काळं फासण्यासाठी आलेले तरुण हे मोटारसायकलवरून आले आणि नंतर लगेच पळून गेले, अशी माहिती शिवसैनिकांनी दिली.

बॅनरवर नेमकं काय लिहिलं होतं?

या बॅनरवर काही मजकूर लिहलेला होता. हा मजकूर खटकल्याने बॅनरवर काळं फासण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ‘देशात ५०० सेना आल्या आणि गेल्या टिकली ती फक्त शिवसेना, नेते खूप आले आणि गेले…पण टिकला तो शिवसैनिक,’ अशा आशयाचा मजकूर बॅनरवर लिहिलेला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here