अनेक दिवसांपासून शहाजी बापू पाटील यांच्याशी संपर्क न झालेल्या एका कार्यकर्त्यानं आमदार साहेबांना फोन केला. आहात कुठे अशी विचारणा कार्यकर्त्यानं केली. त्यावर ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ असं वर्णन बापू पाटलांनी गावरान भाषेत केलं. त्यांनी केलेल्या वर्णनाची सध्या सोशल मीडियावर हवा आहे. अनेकांनी त्यांचे डोंगरावरचे फोटो ‘काय झाडी, काय डोंगार’ या कॅप्शनसह सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.
सोशल मीडियावर सध्या ‘काय झाडी, काय डोंगार’ची चांगलीच हवा आहे. मीम्सचा नुसता पाऊस पडला आहे. त्यामुळे कधी नव्हे ती शाहजी बापू पाटलांची सोशल मीडियावर चर्चा आहे. बापू पाटील सांगोला मतदारसंघाचे आमदार आहेत. विद्यार्थी दशेपासून ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. १९८५ मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांच्याविरोधात निवडणूक लढवली. मात्र पाटलांचा पराभव झाला. पुढच्या विधानसभा निवडणुकीतही ते पराभूत झाले.
१९९५ मध्ये शहाजी बापू पाटील अवघ्या १९२ मतांनी निवडून आले. गणपतराव देशमुख यांचा त्यांनी पराभव केला. मात्र त्यानंतर झालेल्या चार विधानसभा निवडणुकांमध्ये पाटलांचा पराभव झाला. २०१९ मध्ये पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं. चार पराभव पाहिल्यानंतर पाटील विजयी झाले. गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत यांचा पराभव अवघ्या ७६८ मतांनी पराभव करत पाटील विधानसभेत पोहोचले.
२०१९ मध्ये शहाजी बापू पाटलांनी भाजपकडे तिकीट मागितलं होतं. मात्र जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं फडणवीस यांनी पाटलांनी सेनेत जाण्यास सांगितलं आणि त्यांना सांगोल्यातून निवडून आणलं. त्यामुळेच पाटील आणि फडणवीस यांचे उत्तम संबंध आहेत. फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असं बापू पाटील कार्यकर्त्यासोबत संवाद साधताना म्हणाले. फडणवीस मला भावासारखे आहेत आणि शिंदेसाहेब माझ्याकडे मुलाच्या नजरेनं पाहतात, असं पाटलांनी कार्यकर्त्याला सांगितलं.