बंड करणारे सातत्यानं म्हणत आहेत ते अजूनही शिवसेनेत आहेत, शिवसैनिक आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, जे फुटले आहेत, त्यांची शिवसेना असू शकत नाही. बंडखोर आमदारांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी राजीनामे द्यावेत आणि निवडणुकीला सामोरं जावं, असं आव्हान राऊत यांनी दिलं. मतदारसंघात जा, निवडणूक लढवा आणि निवडून या, असं राऊत म्हणाले.
बंडखोरांमध्ये धमक असेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत, असं आव्हान देताना राऊत यांनी भाजप नेते नारायण राणेंचा किस्सा सांगितला. मी नारायण राणेंना मानतो. शिवसेनेतून बाहेर पडताना त्यांच्यासोबत काही जण गेले. त्यांचा गट लहान होता. पण त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले, असं राऊत यांनी म्हटलं.
मार्च २०२० मध्ये काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या २२ आमदारांनी राजीनामे दिले. काँग्रेसचं सरकार कोसळलं. राजीनामा देत भाजपमध्ये गेलेल्यांनी निवडणूक लढवली. या घटनाक्रमाचा दाखलाही राऊत यांनी दिला. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांचा गट काँग्रेसमधून फुटला. पण त्या सगळ्यांनी राजीनामे दिले आणि निवडून आले, असं राऊत यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेवर लोकांचा विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे शिवसेनेतून बाहेर गेले त्यांनी शिवसेना नावाचा वापर करु नये. आपल्या बापाचं नाव घेऊन मत मागा. बाळासाहेबांचा फोटो लावणार, त्यांचे भक्त आहेत सांगणार. बाळासाहेबांचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत. जे होईल होऊ द्या जे करायचं असेल ते करा, मुंबईत यावच लागेल. हजारो लाखो शिवसैनिकांना आमच्या एका इशाऱ्याची प्रतीक्षा, आम्ही संयम ठेवून आहोत, असा इशारा राऊत यांनी दिला.