मुंबई: पंतप्रधान निधीप्रमाणेच मुख्यमंत्री सहायता निधीत खासगी कंपन्यांकडून दिले जाणारे आर्थिक योगदान ‘सीएसआर’मध्ये ग्राह्य धरण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. पंतप्रधान सहायता निधीत ग्राह्य धरला जातो. मग मुख्यमंत्री सहायता निधीसाठी हा फंड का ग्राह्य धरला जात नाही? असं मला अनेकजण विचारत आहेत. पण मला सीएसआरच्या राजकारणात जायचंच नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकवरून राज्यातील जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधला. यावेळी त्यांनी सीएसआर फंडावर अधिक भाष्य न करता केंद्र सरकारला चिमटे काढले. मला सीएसआर फंडाच्या राजकारणात जायचं नाही. ज्यांना मुख्यमंत्री निधीला सीएसआर फंड द्यायचा आहे. त्यांच्यासाठी वेगळं अकाऊंट उघडण्यात आलं आहे. ते तिकडे रक्कम जमा करू शकतात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या मोफत धान्य योजनेबाबतही खुलासा केला. काही जण म्हणत आहेत की केंद्र तर मोफत धान्य देते आहे. खरे तर केंद्र केवळ तांदूळ मोफत देते आहे. अन्न सुरक्षा योजनेतील लोकांसाठीच हे तांदूळ मोफत मिळणार आहे. मात्र त्यासोबत लोकांना गहू आणि डाळ मिळावी अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. केंद्राकडून हा पुरवठा होईल, अशी आशा आहे, असं सांगतानाच धान्य येताच आम्ही त्याचे वितरण करू, असंही त्यांनी सांगितलं.

गेल्या आठवड्यात सीएसआर फंडाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र सरकारचे कान टोचले होते. ‘खासगी कंपन्यांकडून मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये दिले जाणारे आर्थिक योगदान ‘सीएसआर’मध्ये ग्राह्य धरले जावे,’ अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही या फंडावरून केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here