मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील आमदारांसह केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. शिंदे यांच्या बंडाला भाजपचीच फूस असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. अशातच आता भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज दुपारनंतर पुन्हा एकदा दिल्लीला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फडणवीस यांची या आठवड्यातील ही चौथी दिल्ली वारी असणार आहे.

शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडामागे आमचा हात नाही, असा दावा भाजप नेत्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र हा दावा सुरू असतानाच भाजपचे काही नेते मात्र बंडखोर आमदारांसोबत हॉटेलमध्ये दिसून आले आहेत. तसंच राज्यातही भाजप नेत्यांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी राज्यभरातील भाजप नेत्यांची खलबतं सुरू आहेत. त्यानंतर फडणवीस हे दुपारनंतर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी दाखल होतील, अशी माहिती आहे.

मग महाराष्ट्रात स्मशान आहे का?; ‘काय झाडी, काय डोंगार’ म्हणणाऱ्या आमदारावर राऊत भडकले

भाजप नेत्यांचं मौन

शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने उद्धव ठाकरे राजकीय जीवनातील सर्वांत मोठ्या संकटात सापडले आहेत. मात्र असं असताना दिल्ली आणि मुंबईतील भाजप नेत्यांनी मौन बाळगलं आहे. भाजपश्रेष्ठींशी महत्त्वाची चर्चा करण्यासाठी दिल्लीत येऊन गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्लीतील माध्यमांशी बोलणे टाळले आहे. ऑपरेशन पूर्णत्वाला जाईपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही, अशी सूचना सर्व भाजप नेत्यांना देण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here