नरमू हा चालक असून त्याला दारूचे व्यसन आहे. २०१३ मध्ये नरमू याचे कल्पनासोबत लग्न झाले. तेव्हपासून तो रवारे यांच्याकडेच राहतो. भगवान यांच्याकडे ५० बकऱ्या असून ते दुधविक्रीचा व्यवसाय करतात. अरमनगरमध्ये त्यांचे दुमजली घर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी बकऱ्या विकल्या. त्यांच्याकडे भरपूर पैसे आल्याचे नरमू याला कळाले. तेव्हापासून तो वडिलांना (भगवान) पैसे मागण्यासाठी कल्पना यांना त्रास द्यायला लागला. घर नावे करण्यासाठीही तो कल्पना यांच्यावर दबाव टाकायचा.
शनिवारी रात्री पैशासाठी त्याने कल्पना यांना मारहाण केली. त्याने कल्पना यांचा गळा दाबला. कल्पना यांनी आरडा-ओरड केली. मुस्कानेही आईला सोडविण्याचा प्रयत्न केला. मुलगी कल्पनाच्या आवाजाने भगवान व पुषा हे पहिल्या माळ्यावरून खाली आले. दोघांना बघताच नरमू आणखी संतापला. त्याने कुऱ्हाडीने भगवान व पुष्पा यांच्या गळ्यावर वार केले. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. कल्पना यांनी नरमू याच्या हातातील कुऱ्हाड हिसकावण्याचा प्रयत्न केला. नरमूने पुष्पा यांच्या गळ्यावरही कुऱ्हाडीने वार केले. त्याही खाली कोसळल्या. मुस्कानच्या हातावरही नरमूने कुऱ्हाडीने वार केले. मुलगा महेंद्र (वय ८) हा अन्य खोलीत झोपला असल्याने तो बचावला. त्यानंतर भगवान व पुष्पा या दोघांचेही दगडाने डोके ठेचून नरमू पसार झाला.
एका नागरिकाने एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केले. जखमींना लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी शोध घेऊन नरमू याला अटक केली.