मुंबई: शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा, पक्षाचे दोन तृतीयांश आमदार सोबत असल्याचा दावा शिंदेंनी केला. यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला. सुरुवातीला आवाहनाची भाषा करणाऱ्या ठाकरेंनी बंडखोरांना थेट आव्हान दिलं. शिंदे यांनीदेखील शड्डू ठोकला. यानंतर आता शिंदे गटात मतभेद असल्याचं वृत्त आहे.

एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. सत्ता स्थापनेसाठी चर्चा झडत आहेत. बैठकांचं सत्र सुरू आहे. मात्र सत्ता स्थापन करायची असल्यास बंडखोर आमदारांचा गट कायद्यात बसत नाही. त्यामुळे बंडखोर आमदारांना त्यांचा गट राजकीय पक्षात विलीन करावा लागेल. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून बंडखोर आमदारांमध्ये मतभेद असल्याची माहिती ‘साम’ वृत्तवाहिनीनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.
आता शिंदेंसमोर फक्त अन् फक्त एकच पर्याय शिल्लक; कायदेतज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं
बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या हिंदुत्त्वाच्या मार्गानं जात असल्याचं एकनाथ शिंदेंनी वारंवार म्हटलं आहे. भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्या हालचालीदेखील सुरू आहेत. सरकार स्थापन करायचं असल्यास बंडखोर आमदारांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल. अपक्ष म्हणून सत्तेत सामील झाल्यास कायदेशीर अडचणी येऊ शकतात. या मुद्द्यावरून आमदारांमध्ये मतभेद असल्याचं समजतं.

बंडखोर आमदारांमध्ये मतभेद वाढले आहेत. आमदारांचा स्वतंत्र गट कायद्यात बसत नाही. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा पर्याय आमदारांपुढे आहे. मात्र आम्ही शिवसैनिकच, शिवसेनेसोबतच अशी भूमिका घेणाऱ्या आमदारांना हा पर्याय फारसा रुचत नाही. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्यावरून २० ते २५ आमदारांमध्ये मतभेद असल्याची माहिती आहे. ते मातोश्रीच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे.
शिवसेनेचं ठरलंय! उद्धव ठाकरेंचा इरादा पक्का; शिंदे गटाला तीन आघाड्यांवर दे धक्का?
वाढत्या मतभेदांमुळे एकनाथ शिंदेंच्या गटातील अनेक आमदार मातोश्रीच्या संपर्कात आहेत. उद्धव ठाकरेंशी बोलून मध्यस्थी करा, अशी गळ घालणारे अनेक फोन सेनेच्या वरिष्ठ नेत्यांना येत आहेत. बंडखोरांपैकी १६ आमदार संपर्कात असल्याचा दावा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here