पार्थ डोंगरे, वझे-केळकर कॉलेज

‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका घराघरांत पाहिली जाते. मालिकेतली यश-नेहा यांची जोडीही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. नेहाची मुलगी परी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मायरा वायकुळनंही आपल्या सहजसुंदर आणि निरागस अभिनयानं रसिकांची मनं जिंकली आहेत. नुकतंच यश-नेहाचा विवाहसोहळा धुमधडाक्यात पार पडला. मात्र आता मालिकेनं एक नवं वळण घेतलंय. मालिकेत नेहाचा पहिला नवरा अविनाशची एंट्री होणार आहे. परीचे बाबा कोण असतील याबाबत प्रेक्षकांमध्ये चर्चा होती. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अभिनेता निखिल राजेशिर्के अविनाशच्या भूमिकेत झळकला आहे.
चौधरींच्या कंपनीसाठी नेहाने मिळवलं १०० कोटींचं डील, यामुळे होणार पहिल्या नवऱ्याची भेट
अविनाश या भूमिकेबद्दल निखिल म्हणाला, ‘एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून हवी असेल तर ती मिळतेच, असं म्हटलं जातं. तसंच माझ्याबाबतीतही झालं. अजय मयेकर, सुनील भोसले आणि वाहिनी यांच्या एकमतानं अविनाश ही भूमिका माझ्या वाट्याला आली. त्यामुळे आनंद वाटतोय. त्याचबरोबर आता जबाबदारीही वाढली आहे. सध्या अविनाशच्या दिसण्याबाबतचं वेगळेपण आणि विशेष लकबी साकारण्यासाठी विचार करून मी काम करतोय.’

‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्यात निखिलची एंट्री होतेय. अशा वेळी काम करताना दडपण होतं का असं विचारल्यावर तो म्हणाला, ‘मालिकेतल्या रंजक वळणावर प्रवेश करताना रंगभूमीवर प्रयोग सुरू व्हायच्या आधी कलाकारांच्या मनात जशी धाकधूक असते तशीच धाकधूक अविनाश साकारताना माझ्या मनात होती. परंतु सहकलाकार आणि तंत्रज्ञांच्या सहकार्यामुळे कामाचं दडपण आलं नाही.’ या भूमिकेच्या तयारीसाठी त्याला मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकरचं मार्गदर्शन मिळाल्याचं तो आवर्जून सांगतो. निखिलनं याआधी छोट्या पडद्यावर बरंच काम केलं आहे. ‘दे धमाल’, ‘नायक’, ‘आभाळमाया’, ‘अरुंधती’, ‘एक मोहोर अबोल’, ‘लगोरी’, ‘प्रीती परी तुजवरी’ , ‘अजूनही बरसात आहे’ अशा लोकप्रिय मालिकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तर अनेक सिनेमा आणि नाटकांमध्येही त्यानं उल्लेखनीय काम केलं आहे.

अविनाश ही भूमिका नकारात्मक असली तरी परीला ती आवडेल अशा पद्धतीनं साकारण्याकडे लक्ष देत असल्याचं निखिलनं सांगितलं. तो साकारत असलेल्या अविनाशच्या येण्यानं या मालिकेत पुढे काय घडणार आहे, हे पाहणं रंजक असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here