मुंबई : “काल मला एका मित्राचा फोन आला. तो मला म्हणाला, गद्दारांना धडा शिकविण्यासाठी तुम्ही तुमचं आडनाव काही दिवसांसाठी ‘ठोकरे’ करा. मी सांगितलं ठोकरे पेक्षा ‘ठाकरे’ पॉवरफुल आहे, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. त्यावर समोर बसलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला सुरुंग लावून जवळपास ३८ आमदार गुवाहाटीला नेले आहेत. त्यानंतर डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उर्वरित सेना नेते कार्यकर्ता मेळावे घेत आहेत. आज कलिना येथे शिवसेनेचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांचा खरपूस समाचार घेतला.

“सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात बसण्यासाठी हे देशातील पहिलंच बंड असेल. पण ते विधानसभेत येणार नाही, याची पुरेपूर काळजी आपण घेत आहोत. फ्लोअर टेस्टसाठी त्यांना कधी ना कधी मुंबईत यावंच लागेल. त्यावेळी बंडखोरांनी फक्त माझ्या डोळ्यात डोळे घालून बघावं. त्यांनी फक्त मला निधीचं कारण सांगावं. मग सरकारने किती निधी उपलब्ध करुन दिला, हे मी त्यांना सांगतो. पण जे होतं ते चांगल्यासाठी. बरं झालं घाण निघून गेली. ज्यावेळी फ्लोअर टेस्ट होईल त्यावेळी विजय हा शिवसेनेचाच होईल”, असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्र्यांना आणखी एक धक्का; आठवा मंत्री गुवाहाटीकडे रवाना
“काल मला एका मित्राचा फोन आला. तो म्हणाला आदित्य, तुम्हाला आता लढा द्यायचा आहे. बंडखोरांना अद्दल घडवायची आहे. तुम्ही तुमचं आडनाव काही दिवसांसाठी ‘ठोकरे’ करा. पण मी त्याला सांगितलं ठोकरे पेक्षा ‘ठाकरे’ खूप पॉवरफुल्ल आहे, अशी कोटी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. आदित्य ठाकरे यांच्या शाब्दिक कोटीने शिवसैनिकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

वर्षा बंगला सोडलाय पण जिद्द नाही

“उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडलाय पण जिद्द नाही. फुटीरांनी पक्ष सोडला आहे किंवा नाही पण शिवसैनिक ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. जोपर्यंत शिवसैनिक म्हणून आपण काम करतोय, तोपर्यंत संघर्ष हा करावाच लागणार आहे. आपल्या संघर्षाला यश नक्की मिळेल”, असा आशावाद आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
तुमची लायकी असती तर…

“आम्हीच शिवसेना, आमचाच गट अधिकृत, धनु्ष्यबाण आमचंच चिन्ह, आम्ही बाळासाहेब ठाकरे शिवसेना…. ही नावं लावण्याची तुमची लायकी असती तर तुम्ही बंड करायला सुरतला पळाला असता…? बंडखोर जर एवढे शूरवीर असते, बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे भक्त असते तर त्यांनी समोर येऊन सांगितलं असतं की मला मुख्यमंत्री बनवा. बंड जर करायचंच होतं तर ठाण्यात बसून करायचं होतं, मुंबईत बसून करायचं होतं… महाराष्ट्रात लपून बसायची हिम्मत नाही म्हणून सुरतेत पळाले. सुरतेतून गुवाहाटीला पळाले”, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी बंडखोरांचा समाचार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here