शाहरूख खान आणि सैफ अली खान फिल्मफेअर अॅवार्ड सोहळ्याचं निवेदन करत होते. यावेळी प्रेक्षकांमध्ये नील नितीन मुकेशही होता. निवेदनात गंमतीजंमती करत असतना शाहरूख आणि सैफने नीलची फिरकी घ्यायची ठरवलं आणि हेच नेमकं या खान जोडीला महागात पडलं. शाहरूख आणि सैफचा प्रश्न चेष्टा करणारा नव्हता तर अपमान करणारा होता हे लक्षात आल्यानंतर नीलने त्यांना असं काही सुनावलं की सैफ आणि शाहरूखच्या तोंडात मारल्यासारखं झालं.
काही वेळापूर्वी शाहरूख आणि सैफच्या विनोदावर हसणाऱ्या सेलिब्रिटींच्या चेहऱ्यावरचा रंगही उडाला. एरव्ही शांत दिसणाऱ्या नीलने स्टेजवर अॅवार्ड सोहळ्याची सूत्र हातात घेतलेल्या खान जोडीला चांगलाच दणका दिला. हा व्हिडिओ यू ट्यूबवर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी नीलच्या बाजूनं उभं राहत सैफ आणि शाहरूखचा समाचार घेणाऱ्या कमेंटचा पाऊस पाडला.
काही वर्षापूर्वी फिल्मफेअरच्या अॅवार्ड सोहळयातील हा प्रसंग आहे. यावेळी सैफ आणि शाहरूख हे नील याला विचारतात की तुझं आडनाव काय आहे? जसं आमचं खान हे आडनाव आहे तसं तुला आडनाव नाही का? याच प्रश्नावरून नीलचा पारा चढतो. पण चिडून नव्हे तर अतिशय शांतपणे स्पष्ट बोलून नील सैफ आणि शाहरूख यांना त्यांची जागा दाखवताना या व्हिडिओत दिसत आहे. खरंतर सुरूवातीला नीलला वाईट वाटलं पण हीच वेळ आहे उत्तर देण्याची हे ओळखून नीलने चांगलेच शाब्दिक फटके दिले.
नील म्हणाला, तुम्ही प्रश्न नव्हे तर अपमान केला आहे. माझे वडील नितीन या कार्यक्रमात उपस्थित असूनही तुम्ही आडनाव नाही का असा प्रश्न विचारता. आम्हाला आडनावाची गरज नाही. इथंपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. माझे वडील, आजोबा यांनी बॉलिवूडमध्ये योगदान दिलं आहे. या सोहळ्यातील पहिल्या दहा रांगेत बसण्याचा मान मी कष्टाने मिळवला आहे. त्यामुळे असे प्रश्न विचारण्यापेक्षा तोंड बंद ठेवा.
अचानकपण नीलकडून अशाप्रकारच्या प्रतिक्रियेचा अंदाज न आल्याने सैफ आणि शाहरूख यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तोंडदेखलं सॉरी म्हणून खान जोडीने निभावून नेलं असलं तरी त्या सोहळ्यात नीलच्या हजरजबाबीपणाचं चांगलच कौतुक झालं.