वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली वनपरिक्षेत्रातील गडचिरोली बिटातील कक्ष क्र. १७१ मध्ये बिबट मृतावस्थेत असल्याचे गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यास आढळून आले. सदर घटनेची माहिती उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा यांना मिळाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, वनपरिक्षेत्रधिकारी अरविंद पेंदाम, क्षेत्रसहाय्यक श्रीकांत नवघरे, वनरक्षक राठोड, भसारकर, हेमके आणि वाघ संनियंत्रक पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत बिबटयाच्या शरिरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या. तसेच आजुबाजूच्या परिसरात पट्टेदार वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या. यावरून पट्टेदार वाघ आणि बिबट्या यांच्यामध्ये झुंज झाल्याचं कळलं. मृत झालेल्या बिबट्या अंदाजे ७ वर्षाचा असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
बिबट्याचे शवविच्छेदन करतांना पशूधन विकास अधिकारी डॉ. चेतन नंदनवार व डॉ. सिरणकर उपस्थित होते. सदर संपुर्ण कार्यवाहीत वन्यजीव मानद रक्षक मिलींद उमरे, वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर, वाकडीचे सरपंच सरिता चौधरी, पोलीस पाटील देवेंद्र वाकडे उपस्थित होते. मृत बिबटयाचे शवविच्छेदन करून मृतदेह अग्नी देऊन नष्ट करण्यात आला.
दरम्यान, वाकडी सेमाना जंगल परिसरात वाघाचा संचार असून नागरिकांनी जंगलात जाऊ नये तसेच पाळीव प्राणी सुध्दा जंगलात नेऊ नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.