मुंबई: एकनाथ शिंदे गटाच्या बंडामुळे अक्षरश: खिळखिळी झालेल्या शिवसेनेवर आता राजकीय विरोधकांनी निशाणा साधायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेचे अनेक ‘निष्ठावंत’ आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात दाखल झाले आहेत. सध्याच्या घडीला शिवसेनेचे (Shivsena) मोजकेच आमदार आणि मंत्री उरले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अमेय खोपकर यांनी शिवसेनेवर खोचक शब्दांत टीका केली आहे. अमेय खोपकर यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, शेवटच्या आमदाराला सुद्धा ऑफर दिली होती. पण, “बाबा ओरडतील” म्हणून नाही आला. खोपकर यांच्या या ट्विटचा रोख पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या दिशेने आहे. त्यामुळे आता शिवसेना अमेय खोपकर यांना प्रत्युत्तर देणार का, हे पाहावे लागेल.
एकनाथ शिंदेंसाठी हरिश साळवे मैदानात, सुप्रीम कोर्टात रंगणार हायप्रोफाईल वकिलांची लढाई
एकनाथ शिंदे हे विधानपरिषदेची निवडणूक आटोपल्याच्या रात्री सूरतमध्ये आपल्या समर्थक आमदारांसह दाखल झाले होते. सोमवारी सकाळी त्यांच्या बंडाची माहिती बाहेर आली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ आमदार आणि काही मंत्री होते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनानंतरही शिवसेनेचे आमदार गुवाहाटीत जाऊन एकनाथ शिंदे यांना सामील होण्याचे सत्र सुरुच आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हेदेखील रविवारी गुवाहाटीत जाऊन एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यामुळे शिवसेनेच्या गोटातील मंत्र्यांची संख्या आणखी कमी झाली आहे. उदय सामंत हे आदित्य ठाकरेंच्या जवळचे मानले जातात. बंडखोर नेते एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीत सध्या ९ मंत्री आहेत. तर आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे एकमेव विधानसभेत निवडून आलेले मंत्री उरले आहेत.

गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या पाहता शिवसेनेतील दोन तृतीयांश आमदार शिंदे गटाच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. मात्र, विधानसभेतील बहुमत चाचणीसाठी हे आमदार मुंबईत येतील तेव्हा यापैकी अनेक आमदार पुन्हा शिवसेनेकडे परततील, असा दावा सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात आहे. आदित्य ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या गोटातील १४ ते १५ आमदार आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेनं आमदारांच्या परतीचे दोर कापले

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४० आमदारांसह केलेल्या बंडाला पक्षाने सुरुवातीच्या काळात मवाळ भूमिका घेत हाताळलं होतं. मात्र आता पक्षनेतृत्व दिवसेंदिवस आक्रमक होत चालले असून गुवाहाटी येथे शिंदे गटात दाखल झालेल्या आमदारांना थेट इशारा दिला जात आहे. ‘सामना’तून बंडखोर आमदारांचा ‘गद्दार’ आणि ‘नाचे’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून बंडखोर आमदारांच्या परतीचे दोर कापले जात आहेत का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

राजकीय नाट्याबाबत मनसेचे ‘वेट अँड वॉच’

राज्यात विद्यमान मुख्यमंत्री कायम राहतात की अन्य कोणी मुख्यमंत्री होते याकडे आमचे लक्ष लागले आहे. त्यामूळे तूर्तास तरी आम्ही वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत आहोत, असे मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेसाठी दिलेले पत्र आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवित आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत दातीर म्हणाले, ‘राज्यात विद्यमान मुख्यमंत्रीच कायम राहतात की अन्य कोणी सत्तेवर येते हे पाहणे सध्या महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहोत. महापालिकेच्या मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या असून त्यांचा अभ्यास करून त्यावर हरकती घेण्याची तयारी मनसेने सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here