मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इतर आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. ही राजकीय लढाई आता न्यायालयापर्यंत पोहोचली असून सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. स्वतंत्र गटाला मान्यता न मिळाल्यास एकनाथ शिंदे यांना आपला गट दुसऱ्या एखाद्या राजकीय पक्षात विलीन करावा लागू शकतो. शिंदे यांची काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याने याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना आपली आमदारकी वाचवायची असेल तर त्यांना एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागेल. त्यामुळे ते MIM मध्येही जाऊ शकतो, समाजवादी पक्षातही जाऊ शकतात. मात्र ज्या शिवसेनेनं त्यांना जन्म दिला त्या शिवसेनेचा द्वेष करून त्यांनी असा काही निर्णय घेतला तर महाराष्ट्राची माती या आमदारांना माफ करणार नाही. शिंदे यांनी मनसेतही जावं आणि त्यामुळे जर मनसेचा मुख्यमंत्री होणार असेल तर ऐतिहासिक गोष्ट घडेल,’ असं उपरोधिक भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.

‘मी जिवंत असेपर्यंत उद्धव ठाकरेच माझे नेते राहतील’, शहाजी पाटलांचा व्हिडिओ व्हायरल

अमित शहा आणि बंडखोर आमदार

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा वारंवार महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केला जात आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या आमदारांशी संवाद साधल्याची चर्चा आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, ‘अमित शहा यांनी फोनवरून आमच्या बंडखोर आमदारांशी संवाद साधला आणि त्यामुळे या आमदारांमध्ये अचानक नवचैतन्य पसरली, ही बातमी इंटरेस्टिंग आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here