जगभरातील १२० भाषांमध्ये सुरू असलेल्या ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाची लोकप्रियता प्रचंड आहे. मराठीमधील ‘कोण होणार करोडपती’ची सुरुवात २०१३मध्ये झाली असून आतापर्यंत त्याची पाच पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आली. यापैकी तीन पर्वांचं सूत्रसंचालन अष्टपैलू अभिनेते सचिन खेडेकर यांनी केलं. नुकत्याच सुरू झालेल्या ५व्या पर्वाच्या निमित्तानं ‘मटा गप्पाटप्पा’च्या हॉट सीटवर बसून सचिन खेडेकर यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीचे सोनेरी क्षण उलगडलेच; पण त्याचबरोबर ‘…करोडपती’ हा कार्यक्रम करताना संपूर्ण यंत्रणा कशी काम करते याविषयीही सांगितलं.

प्रेक्षक स्पर्धकांमध्ये गुंतायला हवे
‘कोण होणार करोडपती’ हा खेळ ज्ञान आणि मनोरंजनाची उत्तम सांगड घालणारा आहे. खेळातील प्रश्न-उत्तरांशी प्रेक्षक आपोआप जोडले जातात. स्पर्धकांच्या जीवनाविषयीही प्रेक्षकांना जाणून घेता यावं, हा आमचा प्रयत्न असतो. स्पर्धकांची पार्श्वभूमी, परिस्थिती, जिद्द, स्वप्न यातून प्रेक्षकांनाही प्रेरणा मिळावी हा त्यामागचा उद्देश असतो.

ज्ञानाला प्रणाम
समजा तुम्ही हॉट सीटवर आहात आणि एक कोटीच्या प्रश्नाचं तुम्ही अचूक उत्तर दिलंत; तर बक्षिसाच्या रकमेचं तुम्ही काय कराल असं विचारताच ते म्हणाले, ‘सर्वप्रथम आजवर प्राप्त केलेल्या ज्ञानाला मी प्रणाम करेन. कारण शिक्षण आणि ज्ञानामुळेच हे शिखर गाठणं शक्य आहे. ते एक कोटी रुपये सत्कार्यासाठी वाटून टाकेन. आपल्या कामाच्या, ज्ञानाच्या जोरावर आणखी अनेक कोटी रुपये मिळत राहावेत अशी आशा आहे.’

अमिताभ बच्चन यांची भेट
गेल्या वर्षी आमच्या पर्वाच्या शेवटी हिंदी करोडपती सुरू झालं होतं. फिल्मसिटीत एकाच वेळी करोडपतीचे दोन सेट लागायचे. यादरम्यान अभिनयाचे महानायक आणि ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचा चेहरा असलेले बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची भेट घेता आली. ते मला म्हणाले, ‘हा आहे तुमचा पुढचा प्रश्न असं म्हणताना तुम्ही ज्याप्रकारे हात फिरवता ती तुमची सवय मी कॉपी केलीय.’ बिग बी आपला कार्यक्रम इतक्या बारकाईनं आणि कौतुकानं बघतात याचं मला अप्रूप वाटलं. ‘खरं तर मी तुमच्या अनेक सवयींचं अनुकरण केलं आहे’, असं मीही त्यांना सांगितलं.

तेलुगू भाषेत प्रयत्न
‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम जगभरातील १२० भाषांमध्ये झालेला आहे. भारतातही सहा ते सात भाषांमध्ये हा कार्यक्रम होतोय. मराठी व्यतिरिक्त मला तेलुगू भाषेतील या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायला आवडेल. कारण मध्यंतरीच्या काळात मी काही तेलुगू सिनेमे केले आहेत. सूत्रसंचालन करण्यासाठी आधी भाषा व्यवस्थित शिकावी लागेल आणि भाषेतली गंमत जाणून घ्यावी लागेल.

पडद्यामागे बरीच मेहनत
‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात मी फक्त प्रश्न विचारतो आणि स्पर्धकांना एक मोकळीक देत असतो. कार्यक्रम खुलवण्यासाठी अधिक मेहनत होते ती पडद्यामागे. कार्यक्रम टीव्हीवर प्रसारित होण्याआधी ४ ते ६ महिने एक मोठी यंत्रणा काम करत असते. प्रश्न काढणं, उत्तराचं योग्य स्पष्टीकरण, माहिती मिळवणं ही सगळी महत्त्वपूर्ण कामं केली जातात. आमची एक टीम सामान्य ज्ञानापासून ते पुराण कथा अशा सगळ्या विषयांचा अभ्यास करत असते. त्यातून वैविध्यपूर्ण प्रश्न येतात. स्पर्धकांना हॉट सीटवर पोहोचवण्यापर्यंत बरीच मेहनत घेतली जाते.

राजकारण आणि नाट्य हे समीकरण
आपल्याकडील राजकीय घडामोडींमध्ये आवर्जून नाट्य पाहायला मिळतं. म्हणून कदाचित राजकारणावर आधारित अनेक चित्रपट तयार झाले. योगायोगानं माझ्या वाट्याला अनेक राजकीय भूमिका आल्या. ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटातील मुख्यमंत्र्यांची भूमिका माझी विशेष आवडती आहे. राजकीय वर्तुळात वावरणाऱ्या व्यक्तींचे विविधांगी पैलू मांडण्याची संधी यानिमित्तानं मिळते. प्रत्येक भूमिकेचे विचार मला पटत नाहीत. पण एक अभिनेता म्हणून ती भूमिका उत्तम वठवण्याचा माझा प्रयत्न असतो. सक्रिय राजकारणात उतरण्यासाठी मी अजिबात इच्छुक नाही.

m;

सचिन खेडेकर

मराठीतलं मराठीपण?
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मी काम करतो. तिथले प्रेक्षक स्थानिक भाषेतील सिनेमा आवडीनं आणि कौतुकानं बघतात. आपल्याकडे मराठी प्रेक्षकांचं करमणुकीचं मुख्य साधन हिंदी सिनेमा आहे आणि मराठी चित्रपटांकडून त्यांची एक साचेबद्ध अपेक्षा असते. मराठीतलं मराठीपण प्रेक्षक चित्रपटात शोधत असतो. प्रेक्षकांनी कलाकारांना नवनवीन प्रयोग करण्यासाठी जागा आणि वाव देणं आवश्यक आहे, असं वाटतं.

मी स्वार्थी नट आहे
गेली तीन-चार वर्षं मी मराठी चित्रपट केलेला नाही. ‘बापजन्म’, ‘कच्चा लिंबू’, ‘मुरांबा’, ‘जिएनएसडी’ हे चित्रपट सलग केले होते. तरुण दिग्दर्शकांचा नात्यांकडे बघण्याचा एक फ्रेश दृष्टिकोन असतो आणि तोच मला भावतो. मुळातच मी एक स्वार्थी नट आहे आणि म्हणूनच भूमिका आवडल्याशिवाय मी ती स्वीकारत नाही.

……तर आज मी सीईओ असतो
अभिनेता नसतो तर आज मी एखाद्या नामांकित कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या पदावर असतो. मला पहिल्यापासूनच अभ्यासाची आवड आहे; शिक्षणात रुची आहे. त्यामुळे व्यवस्थापन क्षेत्र निवडलं असतं तर निश्चितच आज एक उच्च पदाधिकारी असतो. आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे मला अधिकाऱ्यांसारखे सुटबुट परिधान करायला खूप आवडतात आणि ही हौस मी ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर भागवून घेतो.

कंपूशाही मला मान्य आहे!
मी आणि महेश मांजरेकर गेली अनेक वर्षं मित्र आहोत. महेश जेव्हा केव्हा चित्रपट लिहीत किंवा दिग्दर्शित करत असे त्यावेळी त्याच्या समोर मी नेहमी असायचो किंबहुना असं म्हणू शकतो की मी एक स्वार्थी नट असल्यामुळे त्याला मी माझ्या पलीकडे कधी बघूच दिलं नाही. कंपूशाहीविषयी म्हणायचं झालं तर कामाच्या निमित्तानं एकत्र आल्यामुळे ती कंपूशाही निर्माण झाली आहे, आपण काम करत असताना एकमेकांना सवयीचे होतो. सुरुवातीपासून एकत्र असल्यामुळे कामसुद्धा एकत्रित सुरू करणं हे सोयीचं वाटतं.

मालिका सध्या नको
मला ओळख मिळाली ती मालिका या माध्यमामुळेच. मालिका हे माध्यम फार प्रभावी असून कलाकाराला घराघरांत पोहोचवण्याचं काम मालिका करते. मी मालिका करत असताना असलेलं तंत्र वेगळं होतं आणि आता ते फार वेगळं झालंय. रोज इतकं काम सातत्यानं करणं मला जमणार नाही असं वाटतं. म्हणून मालिकेपासून दूर राहत आलो; तरी ‘कोण होणार करोडपती’च्या निमित्तानं प्रेक्षकांच्या जवळ आहेच मी!

दहा वर्षांत बरंच बदललं
मी ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या एकूण ३ सीझनचं सूत्रसंचालन केलं. २०१३ मध्ये पहिल्या पर्वाच्या वेळी मनात फार गडबड असायची. मी स्पर्धकाला आपलंसं करतोय ना, त्यावर दबाव तर टाकत नाहीये ना; असे प्रश्न मला नेहमी पडायचे. पहिल्या पर्वामध्ये मी फारसं काही करत नव्हतो. मग दुसऱ्या पर्वामध्ये मी स्पर्धकांबरोबर थोड्या गप्पा-गोष्टी करू लागलो आणि खेळ रंगू लागला. आता या तिसऱ्या पर्वाच्या निमित्तानं स्पर्धकांना, प्रेक्षकांना अजून आपलंसं करण्याचा प्रयत्न असेल.

संकलन : सुरज कांबळे, गौरी आंबेडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here