मुंबई : आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील मतभेद टोकाला गेले असून कालपर्यंत एकमेकांसाठी खिंड लढवणारे पक्षाचे नेते आता आमने-सामने आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंड केलेल्या आमदारांवर शेलक्या शब्दांत हल्लाबोल केला. गुवाहाटीत गेलेल्या ४० आमदारांचा आत्मा मेला आहे, थोड्याच दिवसात त्यांच्या बॉड्या महाराष्ट्रातील येतील, असं राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांची ही टीका एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.

‘आमदारांनी बंडखोरी केली नसून महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षित असणारं सरकार आणण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात मृतदेह येणार म्हणजे काय? ही भाषा म्हणजे महाराष्ट्राची किंवा देशाची संस्कृती नाही. राज्यातील सर्व जनता हे बघत आहे आणि याला जनताच योग्य उत्तर देईल,’ असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच पोकळ धमक्या आम्हाला देऊ नका, इतर कोणाला द्या. आम्ही असल्या धमक्यांना भीक घालत नाही, असा पलटवारही शिंदे यांनी केला आहे.

सर्वात मोठी बातमी, शिंदे गटाच्या याचिकेवर ११ जुलैला सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत इतके आमदार का गेले आहेत, याबाबत नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.

संजय राऊत नक्की काय म्हणाले होते?

मुंबईतील दहिसर येथे काल झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात संजय राऊत यांनी बंडखोरांवर घणाघाती टीका केली होती. ‘गुवाहाटीतील रेडिसन ब्ल्यू हॉटेल हे बिग बॉसचं घर वाटत आहे. बंडखोरी केलेले निम्मे आमदार अपात्र ठरणार आहेत. या आमदारांना आज ना उद्या मुंबईत यावंच लागणार आहे. जे ४० जण तिथे आहेत ते प्रेतं आहेत. जेव्हा ते इथे परत येतील तेव्हा फक्त त्यांचं शरीर येईल त्यांचा आत्मा मेलेला असेल. त्यांना माहिती आहे की जेव्हा ते इथे येतील तेव्हा इथे जी आग लागली आहे त्यात काय होईल. बंडखोरांनी मुंबईत येऊन दाखवावं,’ असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here