महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने आज शिंदे गटाला दिलासा देत १६ सदस्यांच्या अपात्रतेबाबत किमान ११ जुलैपर्यंत निर्णय घेता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश देत महाविकास आघाडी सरकारला धक्का दिला. या निर्णयाने शिंदे गटात उत्साह आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपच्या कोअर टीमची बैठक संपन्न झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील सुधीर मुनगंटीवारांनी माध्यमांना सांगितला.
आजच्या बैठकीत सत्तास्थापनेबाबात कोणतीही चर्चा झालेली नाही. पण सध्या राज्यातल्या राजकीय अस्थिरतेवर भाजपचं बारीक लक्ष आहे. एकनाथ शिंदे गटाकडून आम्हाला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. त्यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर आमची कोअर टीम त्यावर निर्णय घेईल, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
सध्या आम्हाला महाविकास आघाडी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची गरज वाटत नाही. आम्ही वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत आहोत. आम्ही शिवसेनेच्या कुठल्याही आमदारांना बंडखोर समजत नाही. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मी काही बोलणार नाही, मीडियाने त्यांना सिरियस घेऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
राजकीय अस्थिरता असल्याने भाजप आमदारांना राज्याबाहेर न जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. भाजपच्या सर्व १०६ आमदारांना बुधवारी मुंबईत येण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.