काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल, असं गुवाहाटीचं वर्णन तुम्ही सेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांच्या तोंडून ऐकलं असेलच. पाटील आणि इतर आमदारांचं वास्तव्य असलेल्या हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये अनेक उत्तमोत्तम सुविधा आहेत. उठल्या उठल्या हिरवळीवरचा मॉर्निंग वॉक, फिटनेससाठी जीम, खाण्यासाठी वेगवेगळ्या डिश आणि पाहिजे त्या सुविधा हॉटेलमध्ये आहेत. प्रत्येकाला हेवा वाटेल असं आयुष्य सध्या बंडखोर आमदार जगत आहेत.
हॉटेलमध्ये कोणकोणत्या सुविधा?
मॉर्निंग वॉक, जीम, स्वीमिंग, स्पा, स्पेशल ब्रेकफास्ट डिश, सिनेमा, बातम्या पाहण्याची सोय, दुपारचं जेवण, त्याआधी राखीव वेळ, दुपारची झोप, बैठका, हाय टी, मसाज, रात्रीचं जेवण, म्युझिकल नाईट, स्पेशल मसाज अशा एकापेक्षा एक उत्तम सुविधा रॅडिसन ब्ल्यूमध्ये आहेत.
आमदार जेव्हा मतदारसंघात असतात तेव्हा त्यांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विविध कार्यक्रम आणि भेटीगाठी सुरु ठेवाव्या लागतात. लोकप्रतिनिधी कधीही सुट्टीवर नसतात त्यांना कायम जनतेसाठी नेहमी उपलब्ध रहावं लागतं. पण या आमदारांसाठी सध्या सुट्टीची वेळ आहे. कारण, पक्षाविरोधात बंड केल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया होईपर्यंतचा वेळ या आमदारांकडे आहे.
आमदारांना हॉटेलमधून बाहेर पडण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. आमदार फुटण्याची किंवा आमदार मुंबईकडे वळण्याची भीतीही नाकारता येत नाही. त्यामुळेच हॉटेलमध्ये राहूनच आमदाराचं जास्तीत जास्त मनोरंजन कसं केलं जाईल याची काळजी घेतली जात आहे. सत्ता स्थापन होण्यासाठी किती वेळ लागेल ते माहीत नाही. पण आमदारांची मात्र आसाममध्ये सध्या चांगलीच मौज सुरू आहे.
स्पेशल मसाज, स्पा ते म्युझिकल नाईट; शिवसेनेच्या वाघांना रेडिसन हॉटेलमध्ये भन्नाट १४ सुविधा