एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारून आता एक आठवडा उलटला आहे. या काळात शिवसेनेचे आमदार एक-एक करुन एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाले होते. तेव्हापासून संजय राऊत हे बंडखोर आमदारांवर तिखट भाषेत प्रहार करत आहेत. यादरम्यान संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, संदीपान भूमरे, दादा भुसे, प्रकाश सुर्वे अब्दुल सत्तार यांच्यासारख्या नेत्यांची अक्षरश: पिसं काढली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे गोटातील हे आमदार आणखीनच दुखावले गेले होते. गुवाहाटीत गेलेल्या ४० आमदारांचा आत्मा मेला आहे, थोड्याच दिवसात त्यांच्या बॉड्या महाराष्ट्रातील येतील, असेही राऊत यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून वादंगही निर्माण झाला होता.
संजय राऊत यांना ईडीचं समन्स
सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने सोमवारी पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना चौकशीसाठी समन्स धाडले होते. त्यानुसार संजय राऊत यांना मंगळवारी दक्षिण मुंबईतील कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, संजय राऊत आज चौकशीला न जाता वकिलांमार्फत वेळ वाढवून मागण्याची शक्यता आहे. ‘ईडी’च्या नोटीससंदर्भात प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले की, ईडीने मला समन्स पाठवले आहे. छान! महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरु आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. या. मला अटक करा! जय महाराष्ट्र!,असे संजय राऊत यांनी म्हटले होते.